
कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्याकरिता चाकरमानी कुटुंबकबिल्यासह ठाणे रेल्वे स्थानकावर आले खरे. पण मांडवी एक्सप्रेस व कोकणकन्या एक्स्सप्रेस या दोन गाडय़ा उशिरा आल्याने गणेशभक्तांना तब्बल 25 तास रांगेत उभे राहावे लागले. यानिमित्ताने ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला.
रेल्वे स्थानके, एसटी डेपोंमध्ये प्रचंड गर्दी
लाखो गणेशभक्तांनी रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा योग साधून कोकणची वाट धरली. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील रेल्वे स्थानके, एसटी डेपो-बस स्थानकांवर गणेशभक्तांचीच प्रचंड गर्दी दिसली. रविवारी रात्री तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे या रेल्वे स्थानकांतील लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. एसटीच्या मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल बसस्थानकांचा परिसर गणेशभक्तांच्या गर्दीने भरला होता. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफने रेल्वे स्थानकांत कडेकोट पहारा ठेवला आहे.