दादर, लालबागमध्ये खचाखच गर्दी

सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव तोंडावर आला असून बाप्पाच्या सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणरायाच्या सजावटीत कोणतीही कसर बाकी राहू नये यासाठी मुंबईकरांनी आजचा रविवार मार्गी लावला. डेकोरेशनचे साहित्य, कंठी, माळा, फुले व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी लालबाग, दादर गाठत बाजारपेठा पालथ्या घातल्या. त्यामुळे येथील मार्केटमध्ये तुफान गर्दी उसळली होती.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील सर्वच बाजारपेठा फुलल्या आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारी फुले, हार, सजावटीचे साहित्य, मखर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, पूजेसाठी लागणाऱया वस्तू आणि बाप्पाला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी लागणारे पदार्थ खरेदीसाठी आज मुंबईकरांनी विविध बाजारात सकाळपासूनच गर्दी केली. विशेषतः केळीची पाने, विडे, कृत्रिम फुलांच्या माळा या पारंपरिक वस्तूंबरोबरच बाजारात ट्रेंडिंगमध्ये असलेले आकर्षक मखर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी लालबाग, परळ गाठले होते. गणेशोत्सवाला एक दिवस शिल्लक राहिल्याने मिळेल त्या वस्तू वाजवी किमतीत खरेदी करताना मुंबईकर दिसत होते. ऊन-पावसाची तमा न बाळगता नागरिक बाजारपेठांमध्ये हव्या असलेल्या विविध वस्तू शोधत होते. सायंकाळी 5 नंतर या बाजारपेठांना उधाण आले होते. विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारात एकच झुंबड उडाली होती.

गर्दी आणि टॅफिक जाम

आज विविध मंडळांच्या मोठय़ा गणेशमूर्ती लालबाग, परळ या भागातून मुंबई उपनगरच्या दिशेने रवाना झाल्या. त्यावेळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आगमन सोहळय़ाच्या गर्दीचा सामना करावा लागला. आगमन सोहळय़ामुळे आणि खरेदीसाठी लालबाग, दादर गाठलेल्या नागरिकांच्या गदीमुळे काही ठिकाणी ट्रफिक जाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.