गणपती बाप्पा मोरया 2025- मऊ लुसलुशीत मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ सर्वात उत्तम, वाचा

बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास राहिले आहेत. गृहिणींची मोदकाच्या तयारीची लगबग एव्हाना सुरु झाली असेल. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ घ्यावा? या प्रश्नावर अनेकदा चर्चा होते. तांदळाच्या उकडीचे मोदक तयार करताना पीठ उत्तम असणे गरजेचे असते. अन्यथा मोदक चिकट किंवा चिवट बनतात.

गणपती बाप्पा मोरया 2025- बाप्पाच्या नैवेद्यासाठी साधे सोपे न फुटणारे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक

सध्याच्या घडीला बाजारामध्ये मोदकाचे पीठ सहजगत्या विकत मिळते. परंतु हे विकतचे पीठ घेण्यापेक्षा अगदी घरच्या घरीही उत्तम मोदकाचे पीठ आपण बनवू शकतो. मोदक करण्यासाठी तांदूळ निवडताना काही खबरदारी घेणे हे खूप गरजेचे आहे. मोदकांसाठी तांदूळ निवडताना खासकरून इंद्रायणी जुना तांदूळ वापरणे हे सर्वात योग्य मानले जाते. इंद्रायणी तांदळाच्या पीठापासून बनवलेले मोदक थोडे चिकट बनतात.

मोदक करण्यासाठी तांदळाचा दुसरा पर्याय म्हणजे आंबेमोहर हा तांदुळ सगळ्यात उत्तम मानला जातो. आंबेमोहर या तांदळाचे मोदक हे एकदम मऊ लुसलुशीत बनतात. तसेच या मोदकांना चीरही पडत नाही.

गणपती बाप्पा मोरया 2025 – झटपट होणारे शाही मोदक करा घरच्या घरी, वाचा

सुवासिक मोदक खायचे असल्यास बासमती तांदळाचा वापर करणे सर्वात योग्य. या तांदळाचे मोदक थोडेसे चिरण्याची शक्यता असते. बासमती तांदळाच्या पीठाचा मोदक थोडा कोरडा बनतो.

मोदक करण्यासाठी कोलम किंवा नवीन तांदूळ हा अजिबात वापरू नये. यामुळे मोदक फसण्याची शक्यता असते.

मोदकाचे पीठ घरी कशापद्धतीने तयार करावे?


मोदकाचे पीठ घरी तयार करताना सर्वात आधी कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरणार आहात हे निश्चित करावे.

त्यानंतर तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा.

तांदूळ धुतल्यानंतर किमान 15-20 मिनिटे चाळणीत निथळत ठेवायला हवा.

त्यानंतर हे तांदूळ एका सुती कपड्यावर एकसमान पसरवावेत.

हे तांदूळ चांगले कडकडीत सुकवून घ्यावेत. मुख्य गोष्ट म्हणजे हे तांदूळ पंख्याच्या हवेखाली सुकवावेत.

उन्हात हा तांदूळ सुकवल्यास तो अधिक कोरडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोदकांना चिरा पडतात.

तांदूळ हवेखाली नीट सुकल्यानंतर दळून आणावा.