गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधानांनीही आपले पद सोडावे का? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहा यांना सवाल

एखाद्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी तुरुंगातून सरकार चालवणे कितपत योग्य आहे असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला. त्यावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधनांनीही आपले पद सोडावे का? असा प्रतिसवाल केला आहे.

अमित शहा यांनी एका मुलाखातीत म्हटले होते की, जर कुणी नेता पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या खटल्यात तुरुंगामध्ये गेला आणि त्याला 30 दिवसांत जामीन मिळाला नाही, तर त्याने पद सोडले पाहिजे. किरकोळ आरोपांसाठी मात्र पद सोडण्याची गरज नाही. पण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचे आरोप आहेत, असे मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांनी तुरुंगात बसून सरकार चालवणं कितपत योग्य आहे? असा सवाल अमित शहा यांनी विचारला.

त्यावर उत्तर देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ज्या व्यक्तीने गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगाराला आपल्या पक्षात सामील करून घेतले, त्यांच्या सर्व खटले निकाली काढून त्यांना मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री बनवले, अशा मंत्र्याने किंवा पंतप्रधानानेही आपले पद सोडले पाहिजे का? अशा व्यक्तीला किती वर्षांची शिक्षा व्हावी? तसेच जर एखाद्या नेत्यावर खोटा खटला लावून त्याला तुरुंगात टाकले आणि नंतर तो निर्दोष सुटला, तर असा खोटा खटला लावणाऱ्या मंत्र्याला किती वर्षांची शिक्षा व्हावी? असा प्रतिसवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे.