राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; शाळांना सुट्टी, बचावकार्य सुरू

राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोटा, सवाई माधोपुर, करौली, बूंदी, टोंक, बारां, झालावाड आणि जयपूर या आठ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी हिंदुस्थानी सैनिक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) यांच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत सुमारे 500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बूंदी जिल्ह्यातील नैनवा येथे गेल्या 24 तासांत 502 मिमी पावसाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमान आहे. कोटा, सवाई माधोपुर आणि टोंक येथेही पूरस्थिती गंभीर आहे. अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला असून, गावे टापूसारखी बनली आहेत. सवाई माधोपुर येथील रेल्वे स्थानकासह अनेक भागात पाणी साचले आहे. जयपूरमध्येही पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

या पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. कोटा, बूंदी, सवाई माधोपुर, बारां, झालावाड, चित्तोडगड, टोंक, डुंगरपूर आणि भीलवाडा येथील शाळांना 23 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जयपूरमध्ये जिल्हा कलेक्टर जितेंद्र सोनी यांनी सोमवार आणि मंगळवार (24 आणि 25 ऑगस्ट) साठी सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.