
रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यांत पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून खालापुरातील सहा आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली होती. यासाठी सहा ते सात कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र काही ठिकाणी केवळ दहा मीटर रस्त्यांची कामे करून कागदोपत्री एक किलोमीटरची कामे झाल्याचे दाखवून अपूर्ण कामांची बिले खिशात घातली आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा चुराडा करून चालायलाही धड रस्ता नसल्याने नरकयातना भोगतच आदिवासींना ये-जा करावी लागत आहे.
खालापूर तालुक्यातील इजिमा ३७ ते करंबेळी, नारंगी ते नारंगी कातकरवाडी, राम ८८ ते आजिवली नंदनपाडा, कुंबिवली ते कुंबिवली ठाकूरवाडी, होनाड ते टेंभेवाडी, आत्कर गाव ते कातकरवाडी, डोनवत ठाकूरवाडी तसेच कलोते गावातील रस्त्यांसाठी ग्रामसडक योजनेंतर्गत सात कोटींच्या जवळपास अधिक रकमेची कामे मंजूर झाली होती. या कामांचा ठेका मंदार पाटील या कंत्राटदाराला देण्यात आला होता. मात्र ही कामे देताना नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण शिगवण यांनी केला आहे.
विशेष म्हणजे यातील बहुतांश कामे अपूर्ण असताना बिले काढण्यात आली आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये संपवूनही रस्त्यांची कामेच न झाल्याने आदिवासींना अक्षरशः खडी आणि चिखलातून वाट काढत ये-जा करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता तसेच अन्य अधिकाऱ्यांना पत्र देत चौकशीची मागणी केली आहे. मात्र त्यानंतरही प्रशासन डोळेझाक करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा
किरण शिगवण यांनी या सर्व वाड्यांवर जाऊन रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत फोटो तसेच लेखी तक्रार अधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे एका रस्त्याचे काम केवळ दहा मीटर करून एक किलोमीटर केल्याचे दाखवल्याचा आरोप शिगवण यांनी केला आहे. असे असताना याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची झाली असून वाहतुकीसाठी योग्य असल्याची अजब माहिती दिली आहे. त्यामुळे या सर्व घोटाळ्यात अधिकाऱ्यांचाही हात असल्याने कंत्राटदाराबरोबरच त्यांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिगवण यांनी केली आहे.
मिंध्यांच्या आमदाराच्या पीएचा फोन
माहितीच्या अधिकारात या सर्व कामाची माहिती मागवली असता आमदार महेंद्र थोरवे यांचे पीए रोहित विचारे यांनी फोन करून कंत्राटदार व तुमची संयुक्त बैठक लावतो, अशी ऑफर दिल्याचा आरोप किरण शिगवण यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा काय नेमका हेतू आहे याचीदेखील चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.