कल्याणचे पोलीस विशाखापट्टणमच्या जंगलात घुसले; आंतरराज्य गांजा तस्करांवर झडप, 13 जणांना बेड्या

शहरी भागात गांजा विक्रीचे प्रमाण वाढले असतानाच कल्याणच्या पोलिसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलात धडक देत आंतरराज्य गांजा तस्करांवर झडप मारली. परिमंडळ ३ च्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून २९ लाखांच्या गांजासह पिस्तूल, काडतुसे, वॉकीटॉकी, कार, बुलेट, रिक्षा आदी मुद्देमाल जप्त केला आहे. यानिमित्ताने गांजा तस्करी करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून १३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

आंबिवली येथे एका तरुणाला अटक करून त्याच्याकडील १०० ग्रॅम गांजा काही दिवसांपूर्वी जप्त केला होता. हा गांजा त्याने नेमका कुठून आणला याचा तपास पोलिसांनी केला तेव्हा त्याचे धागेदोरे पुणे, सोलापूर ते विशाखापट्टणमपर्यंत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने थेट विशाखापट्टणमच्या जंगलात जाऊन गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या.

वॉकीटॉकीचा वापर

तस्करांच्या टोळीतील शुभम उर्फ सोन्या भंडारी, रितेश गायकवाड, योगेश जाधव हे तिघेजण गांजा आणण्यासाठी विशाखापट्टणमच्या जंगलात जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. हा गांजा कल्याण, डोंबिवली, बदलापूर व अंबरनाथच्या परिसरात बाबर शेख, गुफरान शेख, सुनील राठोड, आझाद शेख व अन्य काही जण विकत होते. पोलिसांनी या सर्वांचा पर्दाफाश केला आहे. विशाखापट्टणमच्या जंगलात रेंज नसल्याने तस्कर वॉकीटॉकीचा वापर करीत होते. ही वॉकीटॉकीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.