
ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. पित्याने विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला हात बांधून विहिरीमध्ये फेकून दिले. यात दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर आरोपी पित्याने स्वत: पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी कमळे ऊर्फ सुरवणे (वय – 19, मूळ रा. बोरजुनी) हिचे एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या तरुणाशी लग्न झाले होते. लग्नाआधीपासूनच तिचे लखन बालाजी भंडारे (वय – 19) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघे संपर्कात होते. 24 ऑगस्ट रोजी सासरचे लोक बाहेर गेल्याची संधी साधत संजीवनीने प्रियकराला घरी बोलावले. यानंतर दोघेही घरामध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले. दोघांना रंगेहाथ पकडत सासरच्यांनी संजीवनीचे वडील मारुती सुरवणे यांना फोन लावून बोलावून घेतले.
तरुणीचे वडील मारुती सुरणे हे बंधु माधव सुरणे आणि वडील लक्ष्मण सुरणे यांच्यासोबत गोळेगाव येथे पोहोचले. सासरच्यांनी दोघांनाही त्यांच्या स्वाधीन केले. यानतंर संजीवनी आणि लखनला घेऊन सर्व बोरजुनीकडे निघाले. बोरजुनी आणि गोळेगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पांडुरंग रस्त्यावरील करमाळा शिवारात पोहोचताच संजीवनीच्या वडिलांनी दोघांना बेदम मारहाण केली आणि हात बांधून 30 ते 40 फूट खोल विहिरीत ढकलून दिले.
त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मारुती सुरणे स्वत: उमरी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि मुलीसह तिच्या प्रियकराचा खून केल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून संजीवनीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया सुरू आहे.