वसई-विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली, 20 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

वसई-विरारमध्ये मंगळवार (26 ऑगस्ट ) रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना झाली. यामध्ये विजय नगर विरार पूर्वेकडील गणपती मंदिराजवळ एक चार मजली इमारत कोसळली. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग बाजूलाच असलेला चाळींवर पडला. मंगळवारी रात्री उशिरा ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २ जण ठार झाले.

इमारतींच्या ढिगाऱ्याखाली जवळपास २० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून अग्निशमनदल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्या मार्फत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये एक वर्षाची लहान मुलगी व तिच्या आईचा समावेश आहे. तर उर्वरित नऊ जखमींना विरार मधील तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


इमारतीला लागूनच असलेल्या चाळींवर पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.या घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ही दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहे.

आतापर्यंत ९ जणांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढून तातडीने संजीवनी, विरार ग्रामीण रुग्णालय, आणि प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अजूनही या ढिगाऱ्याखाली २० जण अडकून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन, महापालिका व स्थानिक नागरिक यांच्या मार्फत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. ज्या भागात इमारत कोसळली आहे तेथे जाण्याचा मार्ग ही अपुरा असल्याने जेसीबी जाण्यास अडचणी येत असल्याने हातानेच मलबा बाजूला केला जात आहे.

कालच चिमुकल्या उत्कर्षां जोयलचा होता वाढदिवस होता
मंगळवारी उत्कर्षां जोयल या चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता.तो साजरा केल्यानंतर रात्री दुर्घटना घडली.त्यात चिमुकल्या उत्कर्षां सोबत तीची आई आरोही जोयल ( वय २४) या दोघींचा मृत्यू झाला.इतर जखमींमध्ये संजय स्वपन सिंग ,प्रदीप कदम ,जयश्री कदम .विशाखा जोयल,मंथन शिंदे ,प्रभाकर शिंदे ,प्रमिला शिंदे ,प्रेरणा शिंदे यांना विरारमधील तीन रुग्णालयात तर मिताली परमार हिला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.