
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानमधून आयात केलेल्या वस्तुंवर लादलेले 50 टक्के टॅरिफ सोमवारपासून लागू झाले आहे. यामुळे हिंदुस्थानच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. रशियाकडून हिंदुस्थान तेल आयात करतो म्हणून ट्रम्प यांनी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलेला आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली असतानाच व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी मोठे विधान केले आहे. रशिया-युक्रेनमधील संघर्षाला नवारो यांनी ‘मोदींचे युद्ध’, असे म्हटले आहे.
हिंदुस्थानने रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये तेलाची खरेदी करून मॉस्कोच्या आक्रमकतेला चालना दिली आणि त्यामुळे अमेरिकेच्या करदात्यांवर भार पडला. हिंदुस्थानने रशियाकडून तेलाची खरेदी थांबवली तर अमेरिकेने लादलेले अतिरिक्त 25 टक्के टॅरिफमध्ये सवलत मिळू शकते, असे पीटर नवारो म्हणाले. ते ब्लूमबर्ग टेलिव्हिजनच्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
टॅरिफबाबत अमेरिकेची हिंदुस्थानची चर्चा केलीय का? असे विचारले असता पीटर नवारो म्हणाले की, हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवली आणि युद्धास बळ देणे थांबवले तर त्यांना उद्याच 25 टक्के सवलत मिळेल. यावेळी त्यांनी हिंदुस्थानच्या धोरणावर टीका करताना हिंदुस्थानी लोक गर्विष्ठ असल्याचे म्हटले.
रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये तेलाची खरेदी करून हिंदुस्थान रशियाला मदतच करत आहे. रशिया मिळालेला पैसा युद्ध सामग्रीसाठी वापरत असून युक्रेनमध्ये विध्वंस करत आहे. हिंदुस्थान जे काही करत आहे त्यामुळे अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीवर भार पडत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे, असेही ते म्हणाले.
हिंदुस्थान आम्हाला वस्तू विकून रशियन तेल खरेदी करतो. त्यासाठी आमच्याकडून मिळणारा पैसा वापरतो. त्यानंतर ते रिफाईन करून भरपूर पैसे कमावतो. हिंदुस्थानचा पैसा रशियन लोक शस्त्र तयार करण्यासाठी आणि युक्रेनच्या नागरिकांना मारण्यासाठी वापरतात, असा दावाही नवारो यांनी केला.