
‘परदुःख जाणून त्यांच्या जीवनात मानवतेचा व न्याय्य हक्काचा आनंद निर्माण करण्यापेक्षा कोणताही धर्म नाही. झाडे-वेली, पशुपक्षी व दीनदुबळ्यांची सेवा करण्याची प्रेरणा बाबा आमटे यांच्याकडून घेतली. भामरागडच्या त्रिवेणी संगमावर ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून वननिवासी, आदिवासी, फासेपारधी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून माणुसकीचे नंदनवन फुलविताना संपूर्ण आयुष्य सफल होत असल्याचा आनंद आहे,’ अशी भावना ‘पद्मश्री’ डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 105व्या जयंती सोहळ्यानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य, कराड यांनी ‘यशवंतराव स्मृती सदन’ येथे समाजप्रबोधन व सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाचे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा अॅड. संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते ‘सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार-2025’ने सन्मानित करण्यात आले.
समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, रामभाऊ दाभाडे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, प्रा. डॉ. शरद गायकवाड, माजी नगरसेवक सौरभ पाटील, धनगर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण काकडे, शिवानी मुंढेकर, प्रा. पै. अमोल साठे, गजानन सकट, जगन्नाथ चव्हाण, पै. अक्षय सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. आर. पाटील, अभिनेत्री शिवानी मुंढेकर, सामाजिक कार्यकर्ते जावेद नायकवडी, डॉ. एम. बी. पवार, कॉ. सुनील भिसे, उद्योजिका वैशाली भोसले, क्रीडा प्रशिक्षक वसंतराव पाटील, पै. किरण साठे, उद्योजक जगन्नाथ सोनावणे यांना ‘समाजगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कवी प्रकाश नाईक यांच्या ‘या शकलांना सांधूया’ या कवितेस ‘प्रा. हरि नरके स्मृती साहित्य पुरस्कार’ देऊन गौरविले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रमोद तोडकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. हरिभाऊ बल्लाळ यांनी आभार मानले.