दहा दिवस दारूबंदी आदेशाला स्थगिती

शहरातील मध्यवर्ती म्हणजेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या संपूर्ण गणेशोत्सव काळात दारू व वाईन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पारित केले होते. मात्र, या निवडक दारूबंदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळत स्थगिती दिली आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील दुकाने पूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत.

गणेशोत्सव हा पुण्याचा आत्मा मानला जातो. या काळात कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणाऱ्या घटना घडू नयेत, यासाठी काही ठरावीक दिवशी दारूबंदी लागू केली जाते. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते, मोठ्या मिरवणुका आणि रात्रभर सुरू राहणारी उत्सवांची लगबग लक्षात घेऊन पोलीस प्रशासन सतर्कतेच्या दृष्टीने असा निर्णय घेत असते. त्यानुसार यंदा शहरासह जिल्ह्यात गणेश आगमन आणि विसर्जन तसेच इतर काही महत्त्वाच्या दिवशी महा विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तर, मध्यवर्ती भागातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत दारू विक्री बंद करण्यात आली होती. मात्र, याबाबत संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता मध्यवर्ती भागातील दुकाने संपूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत. शहर व जिल्ह्यात मद्य विक्रीवरील निर्बंध मध्यवर्ती भागासाठी कायम राहणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पालिका क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन पार पडते, त्या क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही लागू आहेत.