Beed news – धारूर तालुक्यात मुसळधार, वाण नदीला आलेल्या पुरात कार आणि रिक्षा वाहून गेली, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

धारूर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला असून धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याच्या प्रवाहात रात्री चार चाकी कार आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे जण बेपत्ता झाले होते. यातील एकाचा मृतदेह सापडला असून अद्याप एकजण बेपत्ता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून तांदळवाडी धरण भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे आवरगाव व अंजनडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी रात्री रूईधारूरहून अंजनडोहकडे जाताना रात्री 8 वाजता आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे (४२) यांची कार पुलावरून वाहून गेली. प्रशासन, पोलीस व गावकर्‍यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवली. अखेर गुरूवारी सकाळी सहा वाजता पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेहाचा सापडला.

आवरगाव येथे तरूण बेपत्ता

दरम्यान, आवरगाव पुलावरूनही रात्री बारा वाजता एक रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात अनिल बाबुराव लोखंडे (२६) हा तरूण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नदी, नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच प्रयाण करावे, असा इसारा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.