
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…वाटद एमआयडीसी हद्दपार म्हणत वाटद पंचक्रोशीतील घरादारावर एमआयडीसीच्या विरोधाचे फलक लागले आहेत. देवा गणराया आमच्या गावावर आलेले संकट कायमचे हद्दपार कर, असे साकडे गणपती बाप्पाकडे ग्रामस्थांनी घातले आहे. घरादारावरील फलक चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे.
वाटद एमआयडीसी विरोधात ग्रामस्थ आता पेटून उठले आहेत. घराघरात एमआयडीसी विरोधातील संघर्षाचे निखारे धुमसत आहेत. वाटद पंचक्रोशीत एमआयडीसी रेटण्याचा घाट रचला जात आहे. एमआयडीसीसाठी दोन हजार दोनशे एकर जमीन संपादित केली जाणार आहे. आपल्या बागायती,घरंदारं जाणार हे कळताच ग्रामस्थ पेटून उठले आहेत. ऐन गणेशोत्सवात वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घरादारावर एमआयडीसी विरोधाचे फलक लावले आहेत. या फलकावर एकच जिद्द वाटद एमआयडीसी रद्द अशी घोषणा लिहिली आहे.आमची स्वर्गासारखी कोकण भूमी वाचवण्यासाठी लढतोय असं म्हणत आमच्या गावावरती आलेलं हे विनाशकारी संकट कायमस्वरूपी नष्ट कर असं साकडं ग्रामस्थांनी गणपतीबाप्पाला घातले आहे. डोळे मिटून झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग येऊ दे अशी प्रार्थना केली आहे.
चाकरमान्यांचा सहभाग
वाटद,कोळीसरे,गडनरळ,वैद्यलागवण,कळझोंडी आणि मिरवणे येथे होणाऱ्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा कडाडून विरोध होत आहे.वाटद एमआयडीसीला चाकरमान्यांनी मुंबईत जनसंवाद सभेत विरोध दर्शवला होता.गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी आले आहेत.एमआयडीसी विरोधातील फलक घरावर लावून ग्रामस्थांनी आपला लढा तीव्र केला. या लढ्यात चाकरमानी सहभागी झाले होते.
आमच्या गावावर आलेले हे विनाशकारी संकट कायमचं नष्ट कर असं साकडं बाप्पाला घातलं आहे.सर्वच गावात हे फलक घरावर लावले आहेत.
– संतोष बारगुडे, अध्यक्ष, वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती