
जम्मू-कश्मीरच्या बांदिपोरा जिह्यातील गुरेज सेक्टरमध्ये आज हिंदुस्थानी लष्कर आणि स्थानिक पोलीस यांची दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार लष्कराने शोधमोहीम राबवली. जम्मू-कश्मीर पोलीस आणि हिंदुस्थानी लष्कराने संयुक्त मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतरही घनदाट जंगलात शोधमोहीम जारी आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिह्यात अखल देवसर परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
दोन जवानांना वीरमरण
चिनार कोर आणि कुपवाडा जिह्यात कर्तव्यावर ऑपरेशनल डय़ुटीदरम्यान हवालदार इक्बाल अली आणि बीएसएफचे कॉन्स्टेबल राजीब नूनिया यांना वीरमरण आले. जम्मू-कश्मीरमध्ये महापुरात अडकलेल्यांना वाचवताना राजीव नुनिया वाहून गेले. चिनार वॉरियर्स जवानाचे शौर्य आणि बलिदानाला सलाम. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आहेत. त्यांचे साहस आणि समर्पण नेहमीच प्रत्येकासाठी प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत चिनार कोरने ‘एक्स’वरून जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.