निवडक बातम्या – देशभरात एक कोटी शिक्षक; शिक्षण मंत्रालयाची आकडेवारी

देशभरात 2024-25 या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची संख्या एक कोटींहून अधिक झाल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. शिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.

 रस्ते अपघातात 4 लाख नागरिकांचा मृत्यू

2023 मध्ये देशभरात रस्ते अपघातात एकूण 4 लाख 8 हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूचे प्रमाण 4.2 टक्क्यांनी वाढले आहे. दर तासाला 20 जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 

वंदे भारतमध्ये आणखी सुविधा

वंदे भारत एक्स्प्रेस आणखी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार असून डब्यांची संख्याही आणखी वाढवण्यात येणार आहे. सात मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

 

वैष्णोदेवी यात्रा तिसऱ्या दिवशीही स्थगित

वैष्णोदेवी मार्गावर अर्धकुवारी येथे मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झाल्यामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्यात आली. ही यात्रा आज तिसऱ्या दिवशीही स्थगितच होती. मोठ्या संख्येने भाविक अडकले असून त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

 

भाजपशासित हरयाणात 4 लाख बेरोजगार

भाजपशासित हरयाणात विविध 65 रोजगार कार्यालयांमध्ये एकूण 4 लाख 4 हजार नोंदणीकृत बेरोजगार असल्याचे समोर आले आहे. विविध सरकारी विभागात 4 लाख 25 हजार पदे रिक्त आहेत. 2 लाख 34 हजार 644 बेरोजगार 12 वी उत्तीर्ण आहेत.