
आगरी-कोळी बांधव हे ठाण्याचे खरे भूमिपुत्र. शहराचा विकास झपाट्याने होत असतानाच टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु भूमिपुत्र आगरी-कोळ्यांच्या गावातील रस्त्यांना स्थानिक साहित्यिक, लेखक, कवींऐवजी बिल्डरांची नावे दिल्याने संताप व्यक्त होत आहे. बिल्डरांच्या नावांच्या पाट्या एका रात्रीत लागल्याचा आरोप ढोकाळी, कोलशेत, बाळकूम, माजिवडा भूमिपुत्र एकजूट महासंघाचे सचिव साईनाथ पाटील यांनी केला आहे. भूमिपुत्रांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा पालिकेचा डाव असून महासंघाने प्रशासनाच्या मनमानीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. तर सध्याच्या घडीला काही गृहसंकुलांची कामे सुरू असल्याने अनेक मोठ्या विकासकांनी ठाण्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे घोडबंदर पट्ट्यातील अनेक जुनी गावे या शहरीकरणाच्या रेट्यात नामशेष होत चालली आहेत. त्यातच आता या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना विकासकांची नावे देण्यात आली असल्याने भूमिपुत्रांविरोधात ठाणे महापालिका असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढोकाळी, बाळकूम, कोलशेत, कासारवडवली, आनंदनगर आदी गावांना जोडणाऱ्या सर्व रस्त्यांना नवीन नावे दिली जात असल्याने भूमिपुत्र व स्थानिकांचे या परिसरात आता स्थान राहिले आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ही नावे दिली असती तर आनंद..
ठाण्याचा इतिहास लिहिणारे गोविंद कुंटे, प्रथम महापौर सतीश प्रधान, ज्येष्ठ विधिज्ञ, समाजसेवक वामनराव ओक, शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनंत तरे, गौतम भोईर, बाळकृष्ण पूर्णेकर, सरपंच नारायण पाटील, कृष्णा पाटील, हनुमान भोईर अशी दिवंगत नेते, साहित्यिक व्यक्तींची नावे रस्त्यांना दिली असती तर आनंद झाला असता, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे.
शर्मा, गाला यांचे योगदान काय?
ढोकाळी, बाळकूम, कोलशेत येथील मार्गांना शर्मा, गाला अशी नावे देण्यात आली आहेत. या व्यक्तींचे या परिसरात सामाजिक योगदान नेमके काय आहे, जर या बिल्डरांच्या रस्त्याला काही प्रमाणात जागा गेली असेल तर त्याचा मोबदला म्हणून त्यांनी महापालिकेकडून वाढीव एफएसआय घेतला आहे. मग त्यांच्या नावाने रस्ता का, असा सवाल भूमिपुत्रांनी केला आहे.
“आम्हाला कोणत्याही दिवंगत व्यक्तीवर किंवा त्यांच्या कर्तृत्वावर आक्षेप नाही. मात्र स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी येथील भूमिपुत्रांच्या जमिनी विकत घेऊन मोठमोठे प्रोजेक्टस् उभारले त्यांची नावे देण्यात आली आहेत. त्याला आमचा विरोध आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले आहे.”
साईनाथ पाटील, सचिव, भूमिपुत्र एकजूट महासंघ