चमत्कार कसाही होऊ शकतो! उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर उद्धव ठाकरे यांचं सूचक विधान; सुदर्शन रेड्डी यांनी घेतली भेट

चमत्कार कसाही होऊ शकतो. तर चमत्कार हा करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांना आपल्या देशाबद्दल खरंच आतून प्रेम आहे ते सगळेजण मिळून सुदर्शनसाहेब यांच्या रुपाने एक चांगले उपराष्ट्रपती आपल्याला देतील ही खात्री वाटते, असे सूचक विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी उद्धव ठाकरे आणि सुदर्शन रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आधीचे जे उपराष्ट्रपती होते ते राजीनामा देऊन अचानक गायब झाले. त्याच्यानंतर ही निवडणूक होत आहे. इंडिया आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढतो आहोत. आणि आमच्या आघाडीकडून आदरणीय सुदर्शन रेड्डीसाहेब त्यांचा परिचय आपल्याला करून देण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलेलं आहे. आणि आता जी देशाला गरज आहे ती आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून जी शपथ एखादं पद स्वीकारताना सगळेजण घेतात ती संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीने वागणारे आता आपल्याला उपराष्ट्रपती पाहिजेत. आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की, एकजुटीने या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो आहोत तिला अधिक मजबुती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढवायची. आज मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छाही देतो. खास करून ते मुंबईमध्ये आले, मातोश्रीला आले. आम्ही आपल्याला पाठिंबा तर दिलेलाच आहे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते एकदिलाने आपल्या सोबत आहेत. चमत्कार याला काही चौकट नसते. चमत्कार कसाही होऊ शकतो. तर चमत्कार हा करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांना आपल्या देशाबद्दल खरंच आतून प्रेम आहे ते सगळेजण मिळून सुदर्शनसाहेब यांच्या रुपाने एक चांगले उपराष्ट्रपती आपल्याला देतील ही खात्री वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आवश्यक संख्याबळ जरी नसलं तरी देश एका विचित्र परिस्थितीमध्ये नेला जातोय. आणि त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी जर आपण त्याला थोपवू शकलो तर आपल्या देशातील लोकशाही वाचेल. आणि साहजिकच सधारणतः शंभर दीडशे वर्षांनंतर गुलामगिरीतून जी आपली मुक्तता झाली त्या गुलामगिरीकडे पुन्हा देश जाणार नाही. नुसतं संख्याबळावरती निवडणूक अवलंबून असती तर निवडणूक घेण्यातच अर्थ नाहीये. पण तरी देखली या मतदानात गोपनियता आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या हृदयामध्ये छुप्यापद्धतीने का होईना देशप्रेम आहे, असे एनडीएमधले सुद्धा खासदार हे मतदान करू शकतात. कदाचित ते उघडपणे बोलू शकत नाही. पण देशासाठी प्रेम आहे, असे लोक देशासाठी म्हणून मतदान करू शकतील. म्हणून म्हटलं की चमत्काराला काही व्याख्या आणि आकार नसतो. सगळेजण बघाताहेत राज्यसभेचा कारभार कसा चाललेला आहे, लोकसभेचा कसा चाललेला आहे, देशाचा कसा चाललाय, सरकारचा कसा चाललाय? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

सुदर्शन रेड्डींबद्दलचे अमित शहांचे विधान दुर्दैवी, 18 निवृत्त न्यायाधीशांनीही नोंदवला आक्षेप

“देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, या विनंतीला काय अर्थ आहेत”

देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीचं थोडसं आश्चर्य वाटलं की माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला तरी देखील त्यांच्यासमोर उभे राहून जे माझे उमेदवार निवडून आलेत जनतेने निवडून दिलेत तेही त्यांना पाहिजेत. या विनंतीला काय अर्थ आहेत. आणि तसं जर का पाहिलं तर राष्ट्रपतीपदाची जेव्हा निवडणूक होती तेव्हा तर मी न मागता शिवसेनेने त्यांना मतदान केलं होतं. कोणी मला विनंती केली नव्हती. निवडून आल्यानंतर सुद्धा माझी अपेक्षा नव्हती धन्यवाद सांगण्याची पण एक सौजन्य म्हणतो त्यावेळी फोन आला नव्हता. आता जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या या पद्धतीलाच आता आपल्याला नाकारलं पाहिजे, अशी जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

“सगळंच एक गूढ वातावरण असं देशात तयार होतंय”

वेळ जाण्यापूर्वी जर का कोणी हालचाल केली तर त्याला महत्त्व असतं. वेळ गेल्यानंतर अरे त्यावेळी हे केलं असतं तर बरं झालं असतं. या नंतरच्या पश्चातापाला काही अर्थ नसतो. म्हणून मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे. उपराष्ट्रपती तब्येतीचं कारण सांगून अचानक राजीनामा देतात. त्याच्यानंतर ते गायब होतात. ते कुठे आहेत? हे कोणालाच माहिती नाही. त्यांच्याबद्दल कोण माहिती देत नाहीये. सगळंच एक गूढ वातावरण असं देशात तयार होतंय, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली.

विरोधी पक्षांचं जे एकमत झालेलं आहे ते उद्धवजी यांच्या शिवाय झालं नसतं – रेड्डी

मी विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली आहे. विरोधी पक्षांचं जे एकमत झालेलं आहे ते उद्धवजी यांच्या शिवाय झालं नसतं. हे मला माहिती आहे. संजयजी हे आमच्यासोबत होते. त्यांच्या साथीने आम्ही उमेदवारी दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांची मदत मला आधीच मिळाली आहे. त्यांना धन्यवाद देण्यासाठी दिल्लीहून इथे आलोय. मातोश्रीत आल्यावर असं वाटतंय की, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय इथे घेतलेले गेले. देशाच्या हितात, महाराष्ट्राच्या हितात. हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीत अनेकदा ट्विस्ट आणि ट्रेंड्स निर्माण केले आहेत. आणि मी जिथे बसलोय ते एक मोठे आदरणीय स्थळ आहे, इथूनच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी कार्य केले होते. त्यांचेही आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलोय. आणि त्यांचे आशीर्वाद नक्कीच मला मिळतील, असे बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले.