
केवळ दोन दिवस झालेल्या पावसामुळे लातूरची दाणादाण उडाली आहे. ऑगस्टच्या सरासरी पेक्षा १०७.३ टक्के अधिकचा पाऊस आजपर्यंत झालेला आहे. ६५९ पशु, पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. जिल्ह्यातील तब्बल ६६ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी ९१.८ मि.मी. पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरी १८९.६ मि.मी. पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्यक्षात ३३६.० मि.मी. पाऊस झाला आहे. दि.१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित सरासरी ५११.९ मि.मी. पर्जन्यमानाच्या तुलनेत १०७.३ टक्के म्हणजेच ५४९.२ मि.मी. इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) ७०६.० मि.मी. च्या तुलनेत ७७.८ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दि.२९.०८.२०२५ रोजी ६० पैकी ३६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वांच्या सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, पशुहानी अधिक झाली आहे.
Latur News – मांजरा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला, लातूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
मौजे धसवाडी ता. अहमदपूर येथील शेतकरी लक्ष्मण नामदेव गोजेगावकर यांची गाय पावसामुळे नाल्यात आलेल्या पुरामुळे मयत झाली आहे. मौजे हाळी ता. उदगीर येथे खाजामैनोद्दीन तांबोळी यांच्या शेतातील गोठ्यात पाणी शिरून २ गाभण म्हशी व देवणी जातीच्या एका गाभण गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मौजे गुत्ती ता. जळकोट येथील हुलाजी व्यंकट केंद्रे यांच्या ६०५ कोंबड्या पावसामुळे दगवल्या. गाव मौजे शेळगी येथील पंढरीनाथ सोपान गुंडरे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडून रात्री दोन गाय, एक म्हैस व एक वासरू असे एकूण ४ जनावरे दगावली आहेत. मौजे एंडी येथील शेतकरी चंद्रकांत बसवंतराव कोल्हाळे यांच्या शेतात मध्यरात्री तीनच्या सुमारास वीज पडून बैल दगावला आहे व इतर ठिकाणी १० दुभती जनावरे, १ बैल व वासरू ६ अशी मयत झाले आहेत. मौजे बामणी ता. रेणापूर येथील बाबू मोहम्मद मुजावर या शेतकर्याची एक बकरी (अंदाजे वय आठ महिने) रेणा नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेली आहे. एकूण पशुहानी संख्या २७ (गाय/ म्हशी १७, ७ वासरू, २ बैल, १ बकरी) व ६०५ कोंबड्यांचा समावेश आहे.
Latur News – अतिवृष्टीमुळे लातूरमध्ये जनजीवन विस्कळीत, सैन्य दलाचे पथक दाखल, 10 जणांची सुखरूप सुटका
घरांची पडझड वाढली
मौजे दैठणा ता. शिरूर अनंतपाळ येथील व्यंकट शंकर सामनगावे यांच्या राहत्या घराची भिंत संततधार पावसाने पडली आहे. मौज वाडी शेडोळ ता. निलंगा येथील नसरोदीन सिकंदर शेख, वजीर बंदेअली शेख यांच्या घराची भिंत संततधार पावसामुळे पडली आहे. मौजे तगरखेडा येथील मिलिंद कुंडलिक सूर्यवंशी यांच्या घराची भिंत संततधार पावसामुळे पडली आहे. मौजे चिंचोली भंगार ता. निलंगा येथील शिवलिंग काशिनाथ मेंडुळे यांचे राहते घर पडले आहे. मौजे औराद शहाजानी ता. निलंगा नागनाथ संग्रामप्पा मरळे घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मौजे महापूर येथील बापूराव मंजुळबुवा चौरंगनाथ गोपीनाथ जोगी यांची पावसाच्या पाण्याने भिंत कोसळून नुकसान झाले आहे. लातूर येथील अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या ७, अहमदपूर येथील २ व इतर ठिकाणी असे एकूण ११६ घरांची पडझड झाली आहे. (एकूण पडझड झालेल्या घराची संख्या-११६)


























































