Raigad News – म्हसळ्यात भीषण अपघात; शाखाप्रमुखासह तिघांचा मृत्यू

गोरेगाव-म्हसळा रोडवर रिक्षाचा भीषण अपघात होऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख संतोष सावंत यांच्यासह तिघांचा मृत्यू तर चौघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना खामगाव परिसरात रविवारी दुपारी घडली. सावंत हे कणघरचे शाखाप्रमुख होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे कणघरवर शोककळा पसरली आहे.

शाखाप्रमुख संतोष सावंत हे निष्ठावंत शिवसैनिक असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालक म्हणून जोडधंदा करत होते. रविवारी दुपारी त्याने म्हसळा गोरेगावचे भाडे घेतले. गोरेगावकडे जाताना ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान त्यांची रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरवर जाऊन जोरात आदळली. या अपघातात संतोष सावंत यांना गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील सहा प्रवाशी जखमी झाले. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान प्रवाशी शांताराम धोकटे व शर्मिलाबाई धोकटे दोघांचा मृत्यू झाला.

ब्रेक फेल अन्…

म्हसळा ते गोरेगावच्या दिशेने जाताना संतोष सावंत यांच्या रिक्षाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे संतोष यांचा रिक्षावरील ताबा सुटला. रिक्षा थांबवण्यासाठी त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा डिव्हायडरला धडकली आणि या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला.