धारावीकरांचा आझाद मैदानात एल्गार, 10 सप्टेंबरपासून धारावी बचाव तिरंगा यात्रा

आझाद मैदानात तीव्र आंदोलन करून मराठा समाजाने यश मिळवले. तसाच एल्गार धारावीकरही पुकारणार आहेत. धारावीतील सर्व पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन व्हायला हवे या मागणीसाठी मराठा समाजासारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलनाने दिला आहे. येत्या 10 सप्टेंबरपासून हजारो धारावीकर धारावी बचाव तिरंगा यात्रा काढणार आहेत.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीकरांवर अन्याय होता कामा नये. सर्व पात्र-अपात्र झोपडीवासियांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत असा त्यांचा ठाम आग्रह आहे. मात्र सरकार आणि अदानी समूह धारावीकरांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे धारावीकरांमध्ये नाराजी पसरली आहे. धारावीकरांच्या मागण्यांप्रमाणेच पुनर्विकास झाला पाहिजे अन्यथा अदानी कंपनीच्या अधिकाऱयांना धारावीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने व अन्य पदाधिकाऱयांनी दिला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात मूळ धारावीकरांच्या मागण्या लोंबकळत ठेवल्या जात आहेत आणि अदानी कंपनीला मात्र धारावी गिळंकृत करण्यास मोकळी वाट दिली जात आहे, असा धारावी बचाव आंदोलनाचा आरोप आहे. न्याय्यहक्कांसाठी आता मराठा समाजासारखे आंदोलन करावेच लागेल अशी धारावीकरांची मानसिकता बनली असल्याचे बाबुराव माने यांनी म्हटले आहे. धारावी बचाव तिरंगा यात्रेत धारावीतील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मागण्या काय?

धारावीतील सर्वच पात्र-अपात्र झोपडपट्टीवासियांना 550 चौ.फू.ची घरे धारावीतच द्यावीत.
छोटे व्यावसायिक, लघु उद्योजकांकडे जी जागा सध्या आहे तेवढी जागा त्यांना द्यावी.
धारावीतील महापालिका वसाहतीत रहिवाशांना 750 चौ.फू. ची घरे द्या.
कुंभार बांधवांना त्यांच्या व्यावसायाप्रमाणे जागा द्या.
कोळीवाडय़ाचे सीमांकन करा.
पुनर्विकास प्रकल्पात हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम स्मशानभूमीसाठी जागा देऊन सध्याच्या स्मशानभूमींचा विस्तार करण्यात यावा.
ख्रिश्चन बांधवांसाठी नवीन स्मशानभूमी उभारण्यात यावी.