
जीएसटी सुधारणा करण्याच्या पेंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. आठ वर्षांनी का होईना, कुंभकर्णी झोपेतून जागे झालेल्या सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यांच्या महसुलात घट होणार आहे. या नुकसानीपोटी केंद्राने राज्यांना आणखी पाच वर्षे भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मोदी सरकारने ‘एक राष्ट्र, एक कर’च्या नावाखाली ‘एक राष्ट्र, नऊ कर’ लावून टाकले. आता त्यात सुधारणा होत आहे. मात्र, संपूर्ण कर प्रक्रियेचे सुलभीकरण होण्याचीही गरज आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
खऱ्या जीएसटीची अजूनही प्रतीक्षा
‘आताच्या सुधारणांना ‘जीएसटी 1.5’ म्हटले जाऊ शकते. खऱ्या जीएसटीची म्हणजे ‘जीएसटी 2.0’ ची आम्हाला अद्यापही प्रतीक्षा आहे. सध्याच्या सुधारणांमुळे खासगी गुंतवणूक, विशेषतः उत्पादनास प्रोत्साहन मिळणार का? सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांवरील बोजा कमी होणार का हे येणारा काळच सांगेल,’ असे काँग्रेस प्रवत्ते जयराम रमेश म्हणाले.
मोदी म्हणतात, हा डबल धमाका
आयकर कमी करून उत्पन्न वाढेल ही काळजी घेतली. आता जीएसटीच्या निर्णयामुळे खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे हा डबल धमाका आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनीही जीएसटी सुधारणांचे कौतुक केले.