
>> स्पायडरमॅन
क्लब किंवा कॅफे म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येते ते मनोरंजनाचे ठिकाण. मित्रांना भेटण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आपण अशा ठिकाणी जात असतो. अशा क्लबच्या जोडीला आता तुमचे दुःख हलके करणारे क्लबदेखील उदयाला येऊ लागले आहेत. मुंबईमध्ये नुकतीच ‘क्राय क्लब’ची सुरुवात झाली आहे. इथे तुम्ही अनोळखी लोकांसोबत बसून मुक्तपणे तुमच्या अश्रूंना वाट मोकळी करून देऊ शकता. मनातल्या व्यथा सांगू शकता आणि मनावरचा ताण हलका करू शकता. रडणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे समजले जाते. रडणे आपल्या भावना संतुलित करते आणि ताण कमी करण्यास मदत करते. भावनेला वाट मोकळी करून देत रडणे आपल्या शरीराच्या पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्थेला सक्रिय करते, जे आपल्याला तणावातून बाहेर पडण्यास मदत करते. रडण्यामुळे ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिनसारखी हार्मोन्सदेखील बाहेर पडतात, जी मनःस्थिती सुधारण्यासदेखील मदत करतात. हे क्लब तुम्हाला भावना मोकळ्या करण्यासाठी एक सुरक्षित वातावरण, छानसा चहा किंवा काॅफी आणि मंद संगीतदेखील उपलब्ध करून देतात. तुमच्या सोबत असलेले अनोळखी लोक तुमचे दुःख ऐकून तुमच्याविषयी कोणतेही मत बनवत नाहीत किंवा तुम्हाला सल्लादेखील देत नाहीत. ते स्वतःदेखील भावना मोकळ्या करतात आणि तुम्हालादेखील करण्यास मदत करतात. जपानमध्ये बऱयाच काळापासून असे क्लब सुरू आहेत. या प्रकाराला तिथे ‘रुईकात्सु’ असे म्हणतात. इथे लोक एकत्र बसून एखादा भावनिक चित्रपट पाहतात, एखादी हळवी करणारी कथा किंवा हृदयस्पर्शी पत्राचे वाचन करतात. अश्रूंना वाट मोकळी करून देण्यास मदत मिळेल असे कोणते ना कोणते कार्य तिथे केले जाते आणि मनावरचा ताण हलका केला जातो.