
हिंगोलीतील येळी फाटा येथे सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी काढण्यात आलेल्या शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनामुळे औंढा नागनाथ ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अडीच ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
औंढा नागनाथ ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील येळी फाटा येथे आज शुक्रवारी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी काढण्यात आलेल्या शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. या वेळी हैदराबाद गॅझेटियर तत्काळ रद्द करण्यात यावे यासह न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात गठित केलेली समिती रद्द करण्यात यावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण आता व भविष्यातही देण्यात येऊ नये या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. औंढा नागनाथ ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक जवळपास अडीच ते तीन तास ठप्प झाली होती.
बारामतीत ओबीसी समाजाचा मेळावा
बारामतीत ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा झाला. यात लक्ष्मण हाके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. गेवराईत अजित पवार यांच्या आमदारानेच हल्ला केल्याचा आरोप केला. दरम्यान हाके यांच्या भाषणावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा पह्न आला. आंबेडकर यांनीही पह्नद्वारे उपस्थितांशी संवाद साधत आरक्षण प्रश्नी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असे आवाहन केले. शारदा प्रांगणातून निघालेला मोर्चा प्रशासकीय भवनावर आल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.