अंजली कृष्णा यांना धमकी देणाऱ्या अजित पवारांची ‘दादा’गिरी थंड; महिलांबद्दल मनात आदर,सोशल माध्यमावरून सारवासारव

पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांना फोनवरून ‘डायरेक्ट अॅक्शन’ची धमकी देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्णपणे बॅकफूटवर आले आहेत. धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी आज केला.

सोलापूर जिह्यात मुरुमच्या उत्खनन प्रकरणी कारवाई करायला गेलेल्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांच्याशी अजित पवार यांचा मोबाईलवर झालेल्या संवादाचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर अजितदादांच्या कार्यपद्धतीवर टीका होताच आज अजित पवार यांनी खुलासा केला.

मंत्र्याने महिला पोलीस अधिकाऱ्याला धमक्या देऊन बेकायदेशीर कामाला संरक्षण देणे हे गंभीर आहे. बेकायदेशीर कामांना राजाश्रय देणे अयोग्य असल्याचे काँगेस प्रवत्ते अतुल लोंढे म्हणाले.

 व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या 20 गावकऱ्यांवर गुन्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार मोबाईलवरून अंजली कृष्णा यांना दमबाजी करत होते, त्यावेळी गावकऱ्यांनी व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केला गेला. याप्रकरणी महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डू गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.