
वारेमाप वीज बिल वसूल करणाऱ्या महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ऐन सणासुदीत कल्याण शहरात २२ तास वीसपुरवठा खंडित होता. बत्ती गुल मुळे दुकानदारांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी संताप व्यक्त केला. महावितरणकडे अनेकदा तक्रारी करूनदेखील वीजवाहिन्या दुरुस्त करत नसल्याचा आरोप करत दुकानदारांनी दुकाने बंद ठेवत निषेध नोंदवला.
कल्याणमधील मुख्य बाजारपेठ असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोहम्मद अली चौक परिसरात वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारपासून वीजपुरवठा खंडित होता. २२ तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने दुकानदार हतबल झाले. ईद आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत हजारो ग्राहक खरेदीसाठी आले होते. मात्र दुकानात अंधार असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली. दोन दिवसांपासूनच वीजपुरवठा खंडित असल्याने दुकानात असलेले इन्व्हर्टर, जनरेटर ठप्प झाले. व्यवसायावर परिणाम झाल्याने दुकानदार हतबल झाले.
वीजवाहिन्या दुरुस्तीसाठी अनेक महिन्यांपासून कल्याणच्या मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांनी महावितरणकडे पाठपुरावा केला. तक्रारी केल्या मात्र महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दुकानदारांनी केला. दुकानात लाईट नाही. त्यामुळे ग्राहक येत नाहीत मग दुकाने तरी कशाला सुरू ठेवायची, असे म्हणत आज दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवून महावितरणचा निषेध नोंदवला.
अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा
महावितरणकडून दुरुस्ती सुरू असल्याचे सांगण्यात येते मात्र अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. २२ तास उलटलेत अद्याप वीजपुरवठा नाही. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून दरदिवस सहा ते सात तास वीज नसते. हा महावितरण अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा असल्याचा संताप कल्याण महानगर व्यापारी संघटनेचे सचिव किरण चौधरी यांनी व्यक्त केला.