
रशियाच्या तेल खरेदीदारांवर अधिक टॅरिफ लावल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव टाकत त्यांना चर्चेसाठी आणण्यासाठीच हे केल्याचे अमेरिकन अधिकारी स्कॉट बेसेंट यांनी सांगितले.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी रविवारी म्हटले आहे की, वॉशिंग्टन आणि युरोपियन युनियनने मॉस्कोमधून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अधिक दुय्यम निर्बंध लादले तर रशियन अर्थव्यवस्था कोलमडून पडेल आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अतिरिक्त टॅरिफ लादण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी सखोल चर्चा केली. तसेच रशियावर अधिक दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन युनियनने काय करणे गरजेचे आहे, यावर चर्चा करण्यात आली.
ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या २५ टक्के परस्पर शुल्काव्यतिरिक्त, रशियाच्या तेलाच्या खरेदीवर भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादले आहे, ज्यामुळे नवी दिल्लीवर लादलेले एकूण शुल्क २७ ऑगस्टपासून ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. ट्रेझरी सेक्रेटरी बेसेंट म्हणाले की, अमेरिका रशियावर दबाव वाढवणार आहे. तसेच आम्हाला आमच्या सहकारी युरोपियन देशांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, अमेरिका आणि युरोपियन युनियन एकत्र आले आणि रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अधिक निर्बंध, दुय्यम कर लावले, तर रशियन अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल आणि त्यामुळे व्लादिमीर पुतिन चर्चेला येतील, असेही त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे, असे सांगत ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त टॅरिफ लादले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी, ज्यात बेसेंट आणि व्यापार सल्लागार पीटर नवारो यांचा समावेश आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, हिंदुस्थानने मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी केल्याने युक्रेनमधील रशियन युद्धाच्या प्रयत्नांना आर्थिक मदत होत आहे.