सामना अग्रलेख – पितृपक्षातली निवडणूक, कौन बनेगा भारत का उपराष्ट्रपती!

देशात सध्या काय चालले आहे ते कोणीच धडपणे सांगू शकत नाही. स्वतःला महान हिंदुत्ववादी समजणाऱ्यांचे सरकार आहे व पितृपक्षातील मुहूर्तावर त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतली आहे. मोदी यांनी धर्मातीत राजकारण सुरू केले व त्यांचा पक्ष चीनच्या सहवासामुळे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरवादाकडे झुकतोय असे म्हणता येईल काय? सध्या तरी पितृपक्षात ‘कौन बनेगा उपराष्ट्रपती?’ हाच प्रश्न आहे!

नरेंद्र मोदी व त्यांचा पक्ष हा हिंदू रीतिरिवाज, परंपरांचे पालन करतो. निदान हिंदू मतांसाठी तसा देखावा तरी करताना दिसतो. शुभ वेळ, मुहूर्त, पंचांग वगैरेंचे पालन करत असतो. हिंदू परंपरेनुसार पितृपक्ष काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही, पण पितृपक्षात भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. आतापर्यंत भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगानेही मोदी-शहांनी काढलेल्या मुहूर्तावरच सर्व निवडणुका घेतल्या, पण देशाच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी सगळ्यांनी मिळून पितृपक्षातला मुहूर्त काढला. खास करून एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुनेजाणते कार्यकर्ते आहेत, प्रखर हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे या मुहूर्ताचे आश्चर्य वाटते. आधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना मोदी-शहांनी तडकाफडकी राजीनामा द्यायला भाग पाडले. धनखड यांनी प्रकृतीचे कारण दिले हे झूठ आहे. धनखडांची प्रकृती ठणठणीत होती. आपले माजी उपराष्ट्रपती त्यांच्या राजीनाम्यानंतर एक महिना होऊनही अद्याप कोणाला दिसत नाहीत. ते कोठे आहेत याविषयी चर्चा होत्या. धनखड आता दिल्लीपासून 24 किलोमीटरवर छतरपूर भागातील एका फार्महाऊसवर आहेत, असे वृत्त समोर आले. म्हणजेच ते अज्ञातस्थळीच आहेत. धनखड हे आजही संपूर्ण चौकी पहाऱ्यात कैद आहेत. त्यांच्या नातेवाईकांनाही भेटू दिले जात नाही. हे माजी उपराष्ट्रपतींच्या बाबतीत घडले आहे. त्यामुळे नव्याने निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी अत्यंत सावध राहायला हवे. अर्थात उपराष्ट्रपतींना गायब व्हायचे नसेल किंवा प्रकृतीच्या खोट्या कारणास्तव दबावाखाली राजीनामा द्यावा लागू नये असे वाटत असेल तर

लोकशाही व स्वातंत्र्याच्या

भोक्त्या खासदार मंडळींनी सर्व विरोधी पक्षांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना मतदान करून निवडून आणायला हवे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करतात. लोकसभा आणि राज्यसभा मिळून 781 सदस्य मतदान करतील. सी. पी. राधाकृष्णन आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात निवडणूक होईल. उपराष्ट्रपतीपदासाठी प्रथमच इतकी रंगतदार लढत होत आहे. भाजपकडे स्वतःचे बहुमत नाही. त्यामुळे त्यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागेल. भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका यंत्रणेचा गैरवापर आणि थैल्यांचा वापर करून लढवतो व निवडणूक यंत्रणाच ताब्यात घेत असतो. उपराष्ट्रपती हे घटनात्मक पद आहे. या निवडणुकीतील अन्य खासदारांची मते फोडण्यासाठी म्हणजे विकत घेण्यासाठी प्रलोभने दाखवली जात असतील तर ते लज्जास्पद आहे, पण नैतिकता, लाज वगैरेंचा संबंध भाजपच्या राजकारणाशी दहा वर्षांपूर्वी तुटला आहे. मोदी व त्यांच्या पक्षाकडे पुरेसे बहुमत आहे, असे त्यांचे म्हणणे असेल तर मग हा फोडफोडीचा आटापिटा करण्याची गरज काय? हा प्रश्न आहे. याचे कारण असे की, भाजपमध्ये सर्व ठीकठाक दिसत नाही. हुकूमशहा सध्या घाबरलेला आहे. हुकूमशहा मनाने अस्थिर झाला की, सगळ्यात आधी बंडाळ्या त्याने निर्माण केलेल्या गुलामांत होतात. गुलामांत स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची भावना निर्माण होते. तसे काहीसे होताना आज दिसत आहे. एक उपराष्ट्रपती हुकूमशहाने गायब केले व दुसऱ्या उपराष्ट्रपतींची निवड सुरू आहे. म्हणून हे मतदान सुज्ञपणाने व राष्ट्रहितासाठी व्हावे. खासदारांनी पक्षनिष्ठेपेक्षा राष्ट्रहित लक्षात घेऊन मतदान करावे. प्रिय राष्ट्राचा अंतरात्मा व आपल्या

आत्म्याचा आवाज

ऐकणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे आवाहन विरोधी पक्षांचे उमेदवार माजी न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांनी केले ते खरेच आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे राज्यपाल (जे मोदी-शहांचे उमेदवार आहेत) सी. पी. राधाकृष्णन यांना स्वतःचे असे मत आणि विचार नाही. मोदी किती महान आहेत व मोदींनी देश किती महान केला हेच राधाकृष्णन म्हणतात. मोदी काळात प्रमुख घटनात्मक पदांवर खुजी माणसे बसवून देशाचे प्रचंड नुकसान केले आहे. यात कुणाचा अवमान करण्याचा हेतू नाही, पण सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तींनी आपली जी हुजुरी करावी याच धोरणाने माणसे निवडून त्या पदावर चिकटवली, हे सत्य कसे नाकारणार? अशा पदावरील व्यक्तींनीही ‘ऊठ’ म्हटल्यावर उठावे आणि ‘बस’ म्हटल्यावर बसावे हीच मोदी व त्यांच्या लोकांची भावना आहे. त्यामुळे पाठीस कणा असलेली कोणतीही व्यक्ती त्यांना चालत नाही. उपराष्ट्रपती धनखड हे जोपर्यंत वाकत होते, तोपर्यंत ते पदावर टिकले. धनखड यांनी थोडे ताठ उभे राहण्याचा प्रयत्न करताच त्यांचा ‘बंदोबस्त’ करून कायमचे गायब केले. जोपर्यंत धनखड यांचे सार्वजनिक दर्शन होत नाही, तोपर्यंत हे असेच म्हणावे लागेल. धनखड यांना उपराष्ट्रपतीपद आणि दिल्लीही सोडावी लागली. नव्या उपराष्ट्रपतींना उद्या कसे वागावे लागेल याचे ट्रेनिंग दिल्यावरच राधाकृष्णन यांची निवड केली असावी. देशात सध्या काय चालले आहे ते कोणीच धडपणे सांगू शकत नाही. स्वतःला महान हिंदुत्ववादी समजणाऱ्यांचे सरकार आहे व पितृपक्षातील मुहूर्तावर त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतली आहे. मोदी यांनी धर्मातीत राजकारण सुरू केले व त्यांचा पक्ष चीनच्या सहवासामुळे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरवादाकडे झुकतोय असे म्हणता येईल काय? सध्या तरी पितृपक्षात ‘कौन बनेगा उपराष्ट्रपती?’ हाच प्रश्न आहे!