
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 850 कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सीला हिंदुस्थानात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारने बेल्जियम सरकारला एक पत्र लिहिले असून यात म्हटलेय की, मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमधील बॅरक नंबर-12 मध्ये ठेवले जाईल. ही कोठडी एकदम प्रशस्त असून या ठिकाणी 6 लोक राहण्याची क्षमता आहे. जेलमध्ये आणल्यानंतर चोक्सीला स्वतंत्र कोठडी, तीन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, मनोरंजनासाठी बॅडमिंटन, कॅरम यासह 14 सुविधा दिल्या जातील, असे म्हटले आहे.
जर मेहुल चोक्सीला हिंदुस्थानात आणले गेले तर त्याच्यासोबत मानवी व्यवहार केला जाईल. केंद्र सरकारने चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी हे पत्र कधी लिहिले याची तारीख अद्याप समोर आली नाही. हिंदुस्थानी तपास एजन्सीच्या प्रत्यार्पणाच्या अपिलावर चोक्सीला 12 एप्रिल रोजी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली होती. मेहुल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी हा पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये मजा मारत आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. हे दोघेही 2018 पासून विदेशात पळून गेले आहेत.
कोणकोणत्या सुविधा मिळणार?
l एक वेगळी स्वच्छ कोठडी l 20 बाय 15 ची कोठडी जागा l या कोठडीला एक स्वच्छ शौचालय आणि बाथरूम l तीन वेळा जेवण, स्वच्छ पाणी l झोपण्यासाठी कॉटनची गादी आणि चादर l कोर्टाच्या ऑर्डरनंतर लोखंडी किंवा लाकडी बेड l सिलिंग फॅन आणि टय़ुबलाईट l 24 तास सीसी टीव्हीची नजर l ताजी हवा मिळावी यासाठी खुले अंगण l योग, मेडिटेशन आणि लायब्रेरी l मनोरंजनासाठी बॅडमिंटन, कॅरम, बुद्धीबळ l 24 तास आरोग्यासाठी फॅसिलिटी l इमर्जन्सीसाठी जेजे हॉस्पिटल l कोर्टाच्या ऑर्डरनंतर घरचे जेवण.