
टेनिस विश्वातील दोन दिग्गजांमध्ये पुन्हा एकदा ग्रॅण्डस्लॅम अंतिम युद्ध रंगले आणि यात स्पॅनिश कार्लोस अल्कराझने इटलीच्या यानिक सिनरला पराभूत करत अमेरिकन ओपनवर कब्जा केला. आळीपाळीने ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची परंपरा या वर्षी दोघांनी कायम ठेवली. या वर्षी दोघांनी दोन दोन ग्रॅण्डस्लॅम जिंकले.
अल्कराझने दमदार सुरुवात करत पहिला सेट 6-2 ने जिंकला. मात्र, सिनरने लढत देत दुसऱया सेटमध्ये 6-3 अशी बाजी मारली. तिसऱया सेटमध्ये अल्कराझने आपली आक्रमक खेळी दाखवत फक्त एक गेम गमावला आणि 6-1 असा सेट संपवला. चौथ्या सेटमध्ये सिनरने परतफेडीचा प्रयत्न केला, पण अखेरीस अल्कराझने 6-4 अशी मात देत किताबावर आपले नाव कोरले.
ही अल्कराझची कारकिर्दीतील सहावी ग्रॅण्डस्लॅम ट्रॉफी ठरली. सामन्यानंतर तो भावुक झाला. या विजयानंतर अल्कराझने एटीपी क्रमवारीत सिनरला मागे टाकत जगातील नंबर वन टेनिसपटूचा दर्जा मिळवला.
सलग तिसरा ग्रॅण्डस्लॅम अंतिम सामना
विशेष म्हणजे, या वर्षी सलग तिसऱयांदा सिनर आणि अल्कराझ ग्रॅण्डस्लॅम अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले. गेल्या आठ ग्रॅण्डस्लॅम ट्रॉफींमध्ये या जोडीनेच वर्चस्व राखले असून, त्यापैकी 10 पैकी 8 वेळा दोघांनी किताबावर कब्जा केला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उपस्थित
फायनलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. लक्झरी बॉक्समधून त्यांनी सामना पाहिला. प्रेक्षकांकडे हात हलवून त्यांनी अभिवादन केले असता त्यांना टाळ्या आणि हूटिंग अशा मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.