
हिंदुस्थानी संघात स्वतःचं स्थान पक्कं करण्यासाठी झगडणाऱ्या संजू सॅमसनच्या पाठीशी आता माजी अष्टपैलू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ठामपणे उभे राहिले आहेत. आगामी टी-20 आशिया कपमध्ये अभिषेक शर्माच्या जोडीला सॅमसनलाच सलामीवीर म्हणून संधी द्यावी, असं मत शास्त्री यांनी स्पष्टपणे मांडलं आहे.
सॅमसन टॉप-3 मध्ये सर्वात खतरनाक फलंदाज आहे. तेथूनच तो सामने जिंकवतो. त्याला बाजूला करणं सोपं नाही. शुभमन गिलला संघात संधी द्यायची असेल तर त्याने इतर कुणाच्या जागी खेळावं, पण सॅमसनला सलामीवीर म्हणून संघात कायम ठेवले पाहिजे.
सॅमसनच्या कामगिरीची भक्कम पार्श्वभूमी
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून संधी मिळाल्यापासून सॅमसनने सातत्याने मोठय़ा खेळय़ा केल्या आहेत. आतापर्यंत सलामीवीर म्हणून 17 सामन्यांत त्याने 520 धावा, 3 शतके नोंदवली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 178.76 इतका आहे. नुकत्याच झालेल्या केरळ क्रिकेट लीगमध्ये सॅमसननं 368 धावा (5 डावांत), 73.60 सरासरी, 186.80 स्ट्राईक रेट, 1 शतक आणि 3 अर्धशतके ठोकून धमाकेदार फॉर्म दाखवला आहे
शास्त्री पुढे म्हणाले, सॅमसन ज्या पद्धतीने हिंदुस्थानसाठी टी 20 क्रिकेटमध्ये खेळला आहे, त्याच शैलीत तो पुढेही खेळायला हवा. टॉप ऑर्डरमध्ये तोच संघाला खरा फायदा करून देतो आणि देऊ शकतो.