
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत गेल्या महिन्यात 29 ऑगस्ट रोजी संपली. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे. विधान परिषदेत विरोधी बाकांवर काँग्रेसचे सर्वाधिक आठ सदस्य आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि आमदार अमीन पटेल यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेत रिक्त असलेल्या विरोधी पक्ष नेते पदाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांनी विधान भवनात जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.