अमेरिकेतही क्रांतीची ठिणगी! डोनाल्ड ट्रम्प यांचा राइट हँड चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या

नेपाळमध्ये ‘जेन झी’च्या क्रांती पाठोपाठ फ्रान्समध्येही जनक्षोभ उफाळल्याचे दिसून आले. यानंतर आता अमेरिकेतही या क्रांतीची ठिणगी पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राइट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यानंतर जगभरातील विविध देशातील सत्ताधारी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे कळते आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सत्ताधाऱ्यांचे धाबे यामुळे दणाणले असून यांना जनक्षोभाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

चार्ली किर्क हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राइट हँड म्हणजे अत्यंत निकटवर्तीय होते. ते उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते होते. किर्क युटा व्हॅली विद्यापीठात आयोजित चर्चेत सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात माइकवरून संवाद साधत असताना अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी किर्कच्या मानेला लागली. गोळी लागताच किर्क जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने, किर्क यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चार्ली किर्क यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट शेअर करून या घटनेची माहिती दिली. झालेल्या घटनेमुळे ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ अबाउटवर एक पोस्ट शेअर केली आहे. “महान चार्ली किर्क आता या जगात नाहीत. सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात. मेलानिया आणि मी त्यांची पत्नी एरिका आणि संपूर्ण कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करतो.”