
परळ-प्रभादेवीला जोडणारा 100 वर्षं जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल हा अखेर बंद करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा पूल पाडकाम सुरू झालं आहे. त्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उड्डाणपूल परिसरातील बाधित होणाऱ्या रहिवाशांनी कडाडून विरोध केल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून हा उड्डाणपूल बंद होऊ शकला नव्हता. आता मात्र बंदची कार्यवाही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत हा जुना पूल जमीनदोस्त करून तेथे नवीन उड्डाणपूल व शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने आवश्यक त्या सर्व परवानग्या व नाहरकती मिळविल्या आहेत. परंतु या पुलाच्या आजुबाजूला असलेल्या 19 इमारतींमधील रहिवाशी बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासह विविध मागण्या असून त्या पूर्ण करा मगच कामाला सुरुवात करा, अशी त्यांची भूमिका आहे. जनमताच्या रेट्यामुळे दोन वेळा बंद करत असल्याचे घोषित करूनही उड्डाणपूल बंद करता आला नव्हता. मात्र अखेर आता हा पूल बंद करण्यात आला आहे.































































