
केवळ भूलथापा देत शेतकरी, कामगार, जनतेचे जगणे मुश्कील करणाऱया, नाशिकला भ्रष्टाचाराच्या काळोखात ढकलणाऱया महायुती सरकारविरोधात शिवसेना आणि मनसेचा संयुक्त विराट मोर्चा आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जन आक्रोशाची मशाल पेटली. भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त नाशिकसाठी यावेळी आवाज उठवण्यात आला.
हनी ट्रप, महापालिकेसह सर्व विभागांमधील भ्रष्ट कारभार, स्मार्ट सिटीने केलेली दैना, कुंभमेळा कामातील भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर सक्ती, बेरोजगारीचा विस्पह्ट, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, हत्या, महिलांवरील अत्याचाराने पसरलेले भीतीचे वातावरण, सावकारी पाश, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, वाढती गुन्हेगारी, पोलीस-सत्ताधाऱयांच्या वरदहस्ताने शहराला पडलेला अमली पदार्थांचा-ऑनलाइन जुगारीचा विळखा या प्रश्नी जाब या मोर्चातून विचारण्यात आला. नाशिक वाचविण्यासाठीचा हा लढा असाच सुरू ठेवू हा ठाम निर्धारही व्यक्त करण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, दिनकर पाटील, डॉ. प्रदीप पवार, जयंत दिंडे, डी. जी. सूर्यवंशी, नितीन आहेर, वसंत गीते सहभागी झाले होते.
महाराष्ट्राचा नेपाळ होतोय, आता अंत पाहू नका; संजय राऊत यांचा सरकारला इशारा
जनआक्रोश उसळला की, नेपाळ, बांग्लादेशसारखी परिस्थिती निर्माण होते. आज भ्रष्टाचार, अमली पदार्थांचा प्रचंड व्यापार, महिलांवरील अत्याचारासारख्या घटनांनी महाराष्ट्राचा नेपाळ होतोय. त्यामुळे आता जनतेचा अंत पाहू नका, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला. जनआक्रोश मोर्चातून सरकारसमोर शिवसेना, मनसेने आव्हान उभे केले आहे, असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ केवळ पह्टो काढून चालत नाही, तर रक्तात छत्रपती शिवरायांचे विचार असावे लागतात. शिवसेना, मनसे सैनिकांच्या रक्तात हे विचार असल्यानेच ते आज सरकारला आव्हान देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले. जेव्हाही जनआक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा नेपाळ, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होते, हाच इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे, असे ते म्हणाले.