
गारेगार टीएमटी बसमधून फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाणेकरांच्या पंतप्रधान योजनेतील १०० इलेक्ट्रिक बसेस लटकल्या आहेत. या बसेस वर्षाच्या सुरुवातीला दाखल होणार होत्या. मात्र सप्टेंबर उजाडला तरी बसेस अद्याप आल्या नाहीत. या नवीन इलेक्ट्रिक बसेसमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने बसेस दाखल होण्यास विलंब होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, अजून काही महिने या बसगाड्यांची प्रतीक्षा ठाणेकरांना करावी लागणार आहे.
ठाणेकरांना दर्जेदार सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, नागरिकांचा प्रवास गारेगार व्हावा आणि शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसची खरेदी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाकडून खरेदी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या १५ व्या वित्त आयोग तसेच पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत पालिकेला एकूण ४०३ इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार असून त्यापैकी १२३ बसेस काही वर्षांपूर्वी परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. प्रवासी संख्येच्या तुल नेत या बसेसची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे बसेसची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.
नऊ मीटरच्या ६० आणि १२ मीटरच्या ४० अशा एकूण १०० बसेसची ठाणेकर वाट बघत आहेत. यापैकी २५ बसेस ऑगस्ट महिनाअखेर दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात होती.
केंद्र शासनाच्या पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत विविध शहरांना देण्यात येणाऱ्या बसेसची नागपूर येथे तपासणी करण्यात आली होती. त्यात काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने या बसेस अद्याप मिळू शकलेल्या नाहीत. तांत्रिक अडचणी दूर करून महिनाभरात बसेस दाखल होण्याची शक्यता आहे.
भालचंद्र बेहेरे (व्यवस्थापक ठाणे परिवहन)