
2024-25 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठी आता केवळ आज आणि उद्याचा दिवस उरला आहे. करदात्यांना 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर करण्याची अखेरची डेडलाईन आहे. त्यामुळे ज्या करदात्यांनी अद्याप आयटीआर फाईल केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरात 9 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केली होती. आयटीआर दाखल करण्याची तारीख आधी 31 जुलैपर्यंत होती, परंतु नंतर ही तारीख वाढवून 15 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली. देशभरात 1 कोटींहून अधिक इन्कम असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत 10 कोटींहून अधिक इन्कम असलेल्या 10,814 लोकांनी आयटीआर भरला आहे. जर करदाते असूनही दिलेल्या तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर त्या व्यक्तीला 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. ज्या करदात्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला 1 हजार विलंब शुल्क भरावे लागेल. जर तुमच्या उत्पन्नातून कर कापला गेला असेल आणि तो सरकारकडे जमा झाला असेल, तर तुमचे उत्पन्न आयकरातील मूलभूत सूट मर्यादेत असले तरीही तुम्हाला आयटीआर दाखल केल्याशिवाय तो परत मिळू शकत नाही. जर तुम्हाला कर परतावा मागायचा असेल, तर त्यासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.
आयटीआर कोणी भरावा
जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्या व्यक्तीने आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. जर तुमच्या नावावर विदेशात मालमत्ता असेल तर आयटीआर भरणे गरजेचा आहे. आर्थिक वर्षात प्रवासावर दोन लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल तर. एकूण विक्री किंवा व्यवसाय पावत्या 60 लाखांपेक्षा जास्त असतील तर. आर्थिक वर्षात व्यवसायातून एपूण उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर. कर कपात 25 हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर. ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजार रुपये आहे. बचत खात्यात एकूण ठेव 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर किंवा चालू खात्यात एकूण ठेव रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर करणे गरजेचे आहे.