नेपाळ- फ्रान्सनंतर आता लंडनमध्येही निदर्शने ; सरकारविरोधात 1 लाख नागरिक रस्त्यावर, इमिग्रेशनविरोधात मोर्चा

सरकारचा हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमध्ये उद्रेक झाला आणि सरकारविरोधात ‘जेन झी’ रस्त्यावर उतरली. नेपाळनंतर फ्रान्समध्येही राष्ट्रपची इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात हजारोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली. नेपाळ आणि फ्रान्समधील आंदोलकांनी विविध शहरांत तुफान दगडफेक, तोडफोड व जाळपोळ केली. सोशल मीडियावर याबाबत अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. आता लंडनमध्येही निदर्शनाचे लोण पसरले असून लंडनच्या मध्यवर्ती भागात 1 लाखाहून अधिक निदर्शकांनी इमिग्रेशनविरोधी मोर्चा काढला.

इमिग्रेशनविरोधी हा मोर्चा शनिवारी काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व इमिग्रेशनविरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांनी केले. यादरम्यान अनेक पोलिस अधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. ‘युनाइट द किंगडम’ मोर्चाच्या नावाखाली हा निषेध आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार लोक सहभागी झाले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पुन्हा फ्रेंच क्रांती! नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही असंतोषाचा भडका, मॅक्रॉन यांच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली

ब्रिटनमधील हॉटेल्सबाहेर निदर्शनांनी मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात सहभागी झालेल्यांनी युनियन जॅक आणि लाल-पांढऱ्या सेंट जॉर्ज क्रॉसचे झेंडे फडकावले. काहींनी अमेरिकन आणि इस्रायली झेंडेही दाखवले. अनेक निदर्शकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ टोप्याही घातल्या होत्या. तसेच त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर टीका करणारे नारे दिले. रॅलीमध्ये निदर्शकांनी अमेरिकन नेते चार्ली कर्क यांच्या अलिकडेच झालेल्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला.

हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये तरुणांचा उद्रेक! संसद पेटवली, काठमांडू लष्कराच्या हाती!! पोलिसांच्या बेछूट गोळीबारात 20 ठार, 400 जखमी