
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये जस्मिन लंबोरियाने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. जॅस्मिनने 57 किलो वजनी गटाच्या सामन्यात पोलँडच्या ज्युलिया झेरेमेटाला पराभूत करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. पोलँडच्या या खेळाडूने 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत लांबोरिया मागे पडली होती. परंतु दुसऱ्या फेरीत तिने पुन्हा पुनरागमन करत बाजी मारली. जॅस्मिनने पोलँडच्या बॉक्सर ज्युलियाला 4-1 ने हरवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. तिच्या या यशाचे संपूर्ण हिंदुस्थानातून कौतुक होत आहे.
दरम्यान, या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 च्या स्पर्धेत एकाही हिंदुस्थानी पुरूष खेळाडूनने पदक जिंकले नाही. गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच पुरुष बॉक्सर पदकाशिवाय परतले आहेत. जदुमणी सिंहचा कझाकस्तानच्या सांजेर ताश्केनबेने 4-0 असा पराभव केला. जदुमणीच्या पराभवामुळे, हिंदुस्थानी पुरुष संघ रिकाम्या हाताने परतणार आहे.
Jasmine Lamboriya clinches Gold at the World Boxing Championship in Liverpool.
Source: Boxinf Federation Of India pic.twitter.com/6o2grqakuz
— ANI (@ANI) September 14, 2025
कोण आहे जस्मिन लम्बोरिया ?
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी जस्मिन लांबोरिया (24) वर्षांची असून ती मुळची हरियाणातील आहे. तिचा जन्म 30 ऑगस्ट 2001 रोजी हरियाणातील भिवानी येथे झाला. लांबोरिया बॉक्सिंगची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहे. जॅस्मिनचे पणजोबा हवा सिंग हे हेवीवेट बॉक्सर आणि दोन वेळा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक विजेते होते. परंतु तिच्यासाठी या क्षेत्रात करिअर करणे सोपे नव्हते. यंदा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून तिने केवळ तिच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेला नाही तर या खेळाद्वारे तिच्या कुटुंबाचे, राज्याचे आणि देशाचे नावही मोठे केले आहे.