
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील दुबईतील रविवारी होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. यातच आम आदमी पक्षाचे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानसोबत सामना खेळणे ही देशाशी गद्दारी असल्याचे म्हटले आहे. आप नेत्यांनी क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र कसे चालू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तर मागितले आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्याला विरोध करत आप नेत्यांनी शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पुतळ्यांना जाळून निषेध व्यक्त केला. केजरीवाल यांनी आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या एका सोशल मीडिया पोस्टला रिट्वीट करत म्हटले की, “पाकिस्तानसोबत सामना खेळणे देशाशी गद्दारी आहे. प्रत्येक हिंदुस्थानी याबाबतीत अत्यंत संतापलेला आहे.”
यातच आप खासदार संजय सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर या दहशतवादविरोधी मोहिमेच्या विधानाचा उल्लेख करताना म्हटले, “मोदीजी म्हणाले होते ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ते चालू आहे, मग ऑपरेशन क्रिकेट कसे काय चालू आहे?”
तर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजींनी अभिमानाने म्हटले होते की ‘टॉक आणि टेरर एकत्र चालू शकत नाही’. राष्ट्रवाद फक्त तुमच्या भाषणांपुरता मर्यादित आहे का?”
पाकिस्तान के साथ मैच खेलना देश के साथ ग़द्दारी है। हर भारतीय इस बात से बेहद ग़ुस्से में है। https://t.co/raX7fitChQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 14, 2025