
हिंदुस्थानची नेमबाज मेघना सज्जनारने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील पहिले पदक पटकवण्याचा पराक्रम केला. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐतिहासिक कांस्यपदकावर नेम लावल्यामुळे हिंदुस्थानने दोन पदकांची कमाई करीत महिलांच्या नेमबाजीत दमदार कामगिरीने हंगामाची यशस्वी सांगता केली. 31 वर्षीय मेघनाने आठ वर्षांनंतर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. अंतिम फेरीत तिने 230.0 गुणांसह कांस्यपदक निश्चित केले. या स्पर्धेत चीनच्या पेंग झिनलूने 255.3 गुणांची नवी जागतिक विक्रमी कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले, तर नॉर्वेच्या जॅनेट हेग डय़ूएस्टॅडला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. संथ सुरुवात करूनही मेघनाने संयम राखत आपली स्थिती सुधारली आणि प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पहिले वैयक्तिक पदक आपल्या नावावर केले. मेघनाच्या कांस्यापूर्वी शनिवारी ईशा सिंहने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते. ईशाने चीनच्या याओ कियानझुनवर अवघ्या 0.1 गुणांनी मात करीत रोमांचक विजय मिळविला.