
देशासाठी हा काळा दिवस – अशोक पंडित
‘देशासाठी हा काळा दिवस आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली. ’पाकिस्तानला जे करायचे असते ते तो करतो. देशाच्या बाबतीत त्यांचा विचार पक्का आहे. देशाचा प्रश्न आला की ते सगळे एकजूट होतात. त्यांना कुठलीही लाज-शरम वाटत नाही. पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हाही तिथल्या क्रिकेटपटूंनी स्वतःच्या देशाचे समर्थन केले. हिंदुस्थानात हल्ले होतात, तेव्हा तिथला कुठलाही खेळाडू, कलाकार निषेधाचा एक शब्द काढत नाही. तरीही आम्ही त्यांच्यासोबत खेळतो, याबद्दल पंडित यांनी संताप व्यक्त केला. ज्या हातांना तुमचं रक्त आहे, ज्या हातांनी तुमच्यावर गोळी चालवलीय, बॉम्ब टाकलेत, त्यांच्याशी कोणत्या तोंडाने हात मिळवणार, तुम्ही कोणत्या तोंडाने टाळी वाजवणार? हेच मला समजत नाही, असे अशोक पंडित म्हणाले. बीसीसीआय केवळ धंदा म्हणून या सगळ्याकडे बघत असेल तर ज्यांनी बलिदान दिलंय, जे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेत, त्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानसोबत खेळणं ही देशाशी गद्दारी– केजरीवाल
पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे ही देशाशी गद्दारीच आहे. हा देशद्रोह आहे. प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात चीड आहे, असे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले.
भाजपवाल्यांनो, ओंजळभर पाण्यात जीव द्या! – ओवेसी
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘देशभक्तीचे ज्ञान लोकांना देणाऱया भाजपवाल्यांनी ओंजळभर पाण्यात जीव दिला पाहिजे. पाकिस्तानशी क्रिकेट खेळताय. तुमची मुलगी मेली असती तर तुम्ही खेळला असता का? पाकिस्तानसोबत खेळून बीसीसीआयला असे किती पैसे मिळणार आहेत? 2000 करोड, 3000 करोड… हे पैसे हिंदुस्थानातील लोकांच्या जिवापेक्षा मोलाचे आहेत का? भाजपवाल्यांनी याचे उत्तर द्यावे, असा हल्ला ओवेसी यांनी चढवला. क्रिकेटचा प्रश्न आला की तुम्ही रनआऊट झालात, असा संताप ओवेसी यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा निषेध – सुप्रिया सुळे
पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबांचे अश्रू अजून थांबलेले नाहीत, ते अजूनही न्याय मागत आहेत. असे असतानाही हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणे हे दुर्दैव आहे. रक्त आणि पाणी एकत्र राहू शकत नाही, दहशतवाद आणि व्यवसाय यावर एकत्र चर्चा होऊ शकत नाही. दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही, हे सांगणाऱया भाजपाने हा निर्णय कसा घेतला, असा सवाल करून सुप्रिया सुळे यांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याच्या निर्णयाचा निषेध केला. आत्मविश्वासाने काम करा, जनता हीच मोठी ताकद आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष या पक्षांतील नेते इतरत्र गेले, पण कार्यकर्ते जागेवर आहेत आणि तीच खरी ताकद आहे.
केदार जाधव याचाही विरोध
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव यानेही हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवला आहे. ही मॅच व्हायला नको होती. मी तशी भूमिका मांडली आहे, असे तो म्हणाला.
बीसीसीआय म्हणतं, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक आयोजकत्व धोक्यात
आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर आम्ही बहिष्कार टाकला तर हिंदुस्थानला राष्ट्रकुल स्पर्धेचे आणि ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याची परवानगी मिळणार नाही, असा दावा बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिला यांनी केला.