
सध्याच्या घडीला स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा गरजेचा भाग झालेला आहे. परंतु अनेकदा आपल्याला स्मार्टफोनची बॅटरी फुगलेली दिसते. ही अशी बॅटरी खूप धोकादायक ठरू शकते. बॅटरी फुगल्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची भीती असते. म्हणून तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर ती बदलणे आवश्यक आहे. फोनची बॅटरी का फुगते आणि असे झाल्यास काय करावे ते जाणून घेऊया.
बॅटरी का फुगते?
आजकाल स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी असतात. बॅटरीच्या आत पातळ धातू आणि प्लास्टिकचे अनेक थर रासायनिक आवरणाने भरलेले असतात. या सर्व गोष्टी जेलसारख्या इलेक्ट्रोलाइटसह अॅल्युमिनियमच्या पाउचमध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर, हे पाउच व्हॅक्यूम पॅक आणि हवाबंद करण्यासाठी उष्णतेने सील केले जाते. बऱ्याच वेळा हे जेल इलेक्ट्रोलाइट्स खराब होतात आणि गॅसमध्ये बदलतात. हा वायू दाब निर्माण करतो, ज्यामुळे पाउच फुगते. यामुळे बॅटरी फुगलेली दिसते.
बॅटरी फुगल्यावर काय करू नये?
बॅटरी फुगल्यानंतरही योग्यरित्या काम करू शकते, परंतु यासाठी चार्जिंगची काळजी खूप काळजीपूर्वक घ्यावी लागते. ही बॅटरी जास्त चार्ज झाली तर स्फोट होऊ शकतो. म्हणून तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर ती चार्ज करू नका. बॅटरी शक्य तितकी डिस्चार्ज होऊ द्या जेणेकरून आग लागण्याचा धोका राहणार नाही.
बरेच लोक घरीच फुगलेल्या बॅटरीची दुरुस्ती करण्यास सुरुवात करतात. असे करणे धोकादायक ठरू शकते. फोनच्या बॅटरीशी छेडछाड केल्याने, स्फोट होऊ शकतो. म्हणून घरी बॅटरी दुरुस्त करणे टाळा. बॅटरी काढण्यासाठी किंवा बदलण्यासाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.