पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

पंतप्रधान मोदी माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे. पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले आहेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज काहीजणांनी पक्ष प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

“रोज लोक येताहेत, शिवसेनेची ताकद वाढतेय”

“जवळपास एक-दोन दिवसाआड शिवसेनेमध्ये प्रवेश हे होत आहेत. मात्र, प्रत्येक वेळेला याला धक्का, त्याला धक्का अशी काही जाहिरातबाजी आम्ही करत नाही. एक कौतुकाची गोष्ट अशी की आज ज्यांनी प्रवेश घेतला ते ओमदाद आणि कैलास त्यांच्या संपर्कात होते. त्यांनी त्यांचं काम पाहिलं. शिवसेनेत मिळत असलेलं प्रेम पाहिलं. इतरही काही त्यांना ऑफर होत्या. या काय ऑफर असतात, कशा असतात त्याची सर्वांना कल्पना आहे. पण त्या सगळ्या आमिषाला पाठ दाखवून शिवसेनेकडे ते आज आलेले आहेत. आणि साहजिकच आहे रोज लोक येताहेत, शिवसेनेची ताकद वाढतेय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“या सरकारचा जो कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा”

“एकूणच या सरकारचा जो कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे. म्हणजे राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल. याचं कारण जवळपास 9 लाख कोटी हे जेव्हा राज्यावरती कर्ज येतं, याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं. हे कसं फेडणार? कोण फेडणार? कधी फेडणार? आणि कर्जातून बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार? कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं, पुलांची कामं, धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही. हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती अधिक लक्ष देणं गरजेचं आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला फटकारले. राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढतोय. पुढच्या तीन महिन्यांत ते 9 लाख कोटींवर जाईल”, अस प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता.

“जय शहाच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार”

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आंदोलन केलं. पण आता असं म्हटलं जातंय की बीसीसीआयचा ही मॅच खेळण्यासाठी खेळाडूंवर दबाव होता, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. “सुनील गावसकरही असंच बोललेत. आणि एकूण भारतीय जनता पक्ष म्हणजेच बोगस जनता पार्टी यांचं देशभक्तीचं ढोंग उघडं पडलेलं आहे. आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहांचा मुलगा जय शहा याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे. हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं बिंग फुटलेलं आहे, खरंच लाज वाटतेय. एक कणखरपणा दाखवायला पाहिजे होता. नाही खेळणार आशिया कप, काय झालं असतं? गेल्या वेळीही बोललो होतो. तेव्हाही हा मुद्दा अधोरेखित केला होता, तो परत बोलतो. पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्वपक्षांच्या प्रतिनिधींची शिष्टमंडळं पाठवली. तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं, दहशतवादा विरुद्ध आहे. कोण करतंय दहशतवाद? पाकिस्तान करतंय. सगळी शिष्टमंडळं जाऊन आली. त्यांनी तिकडे काय सांगितलं, त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला? याच्याबद्दल कोणालाही काहीच सांगितलं गेलं नाही. महत्त्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलंत. आमच्या देशात पाकिस्तान दहशतवाद करतोय, असं जर का सांगितलं आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे. तर जगातील इतर राष्ट्र ही आपल्या हिंदुस्थानच्या पाठीशी उभी का नाही राहिली? आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशात पाकिस्तान दहशतवाद पसरवतो आहे, दहशतवाद करतो आहे आमच्या निष्पाप, निरपराध नागरिकांचे तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर महिन्या चार महिन्यांमध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हा प्रश्न विचारेल, नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात? आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा आणि मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो. नाहीतर आम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे जाऊन केक खाऊन यायचा. ही परराष्ट्र निती ही देशाला तारक आहे, असं काही वाटत नाही, देशासाठी घातक आहे”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

“त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहिती आहे, शहा भक्ती माहिती आहे”

शिवसेनेचं आंदोलन हे देशाभिमानाचं ढोंग आहे, अशी प्रतिक्रिया काहिंनी दिली आहे, असा प्रश्न यांना विचारण्यात आला. “बकवास करणारी लोकं खूप असतात. त्यांना त्यांची बकवास करू देत. कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाही. त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहिती आहे. शहा भक्ती माहिती आहे, मोदी भक्ती माहिती आहे, त्यांनी देश वैगरे शब्दही उचारू नये. एकदम फडतूस माणसं आहेत. कोण मला माहिती नाही पण कोणी असले तरी फडतूस आहेत”, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला तातडीची मदत म्हणून सरकारने द्यायला हवी होती”

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडतोय. शेतीचं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झालीय. तरीदेखील सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. “हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अतिवृष्टी होतेय, ढगफुटी होतेय. पंचनामे सुरू झालेले असतील. पंचनामे करणार आणि मग मोजके पैसे शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्या देखत दिसतंय तरीदेखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर पैसे देणार. पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. पण तातडीने सरसकट एक काहीतरी रक्कम शेतकऱ्याला द्यायला काय हरकत होती? याचं कारण असं देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडी रुपयांची जाहिरात करताय, त्याचा पंचनामा कोण करणार? की हे पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहीरात करायची ते करोडो रुपये, अजूनही असे होर्डिंग आहेत. तुमच्या सगळ्या चॅनेलवरती त्या जाहिराती होत्या. सामना सोडून म्हणजे ही काय माझी पोटदुखी नाही, सगळ्या वृत्तपत्रात जाहिराती होत्या. पण हे करोडो रुपये एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना पहिल्या प्रथमिक मदत म्हणून दिली असती तर काय बिघडलं असतं? तुमच्याकडे पैसा आहे, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय. काय गरज काय होती त्या जाहिरातीची? करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक किंवा तातडीची मदत म्हणून सरकारने द्यायला हवी होती”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला फटकारले.

राज्याच्या लुटीला फडणवीस, अजित पवार आणि डाकू मानसिंगच जबाबदार आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

“सर्वसामान्य माणूस हाच शेवटी क्रांती करत असतो…”

नेपाळमध्ये जनतेनं राज्यकर्त्यांना घालवून दिलंय, तर या घटनेवरून देवाभाऊंनी काही शहाणपण शिकावं, असे शरद पवार म्हणाले होते, यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला गेला. “सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे. केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर, पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे. कारण बांगलादेशींनी हाकलून देणार आणि त्याच बांगलादेशींबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय. त्याच बांगलादेशात जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जाव म्हणताय आणि बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना तुम्ही इकडे आश्रय देताय. आता नेपाळमध्ये घडलंय. पाकिस्तान तर कारवाया करतोच आहे. चीन तर टपून बसलेलाच आहे. तुमचं नेमकं चाललंय तरी काय? कारण सर्वसामान्य माणूस हाच शेवटी क्रांती करत असतो. नेते नाही करत, सर्वसामान्य माणूस करतो. त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्यास ठेच मागच्यास शहाणा ही आपल्याकडे म्हण आहे, ती या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“भूतकाळाच्या घोषणांची भूतं मोदींच्या मानगुटीवर बसलेली”

पंतप्रधान मोदींचा उद्या वाढदिवस आहे, 75 वर्षांचे होत आहेत, या प्रश्नाला उत्तर देत उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. “पंतप्रधान मोदी माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे. पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले आहेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही. आणि तरीदेखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तरी मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की, लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचं त्यांना आकलन व्हावं. आणि पुढची वर्षे चांगला कारभार करावा. भूतकाळामध्ये अनेक गोष्टी त्यांनी केल्या होत्या. आता त्या सगळ्या घोषणांची भूतं त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी बोलले होते, 15 लाख रुपये येणार होते. स्मार्ट सिटी बोलले होते. अच्छे दिन आयेंगे म्हणाले होते. या भूतकाळाच्या घोषणांची भूतं त्यांच्या मानगुटीवर बसलेली आहेत, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.