मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा खोडसाळ प्रयत्न, शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट

मुंबईत दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग टाकून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. काल रात्री अज्ञाताने लाल रंग टाकल्याचा संशय आहे. शिवसैनिकांकडून घटनेचा निषेध करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शाखाप्रमुख अजित कदम यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शिवसैनिकांसह धाव घेऊन पुतळ्यावरील रंग पुसला आणि साफसफाई केली. हा रंग कोणी टाकला याचा तपास करावा. या घटनेची चौकशी पोलिसांनी तातडीने करावी, अशी मागणी करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर आणि नेते दिवाकर रावते यांनी पुतळ्याच्या ठिकाणी धाव घेतली आणि पाहणी केली. खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी पोहचले. माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक आशिष चेंबुरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनीही पुतळ्याची पाहणी केली. शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनीही पुतळ्याची पाहणी केली. या घटनेने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तपास करणार असल्याचे पोलिसांनी म्हटल्याचे आमदार महेश सावंत यांनी सांगितले.