फसवणूक करणारी इराणी टोळी गजाआड

पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीच्या चारकोप पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जाहेद जावेद अली जाफरी आणि काबुल नौशाद अली अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांविरोधात एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांकडून पोलिसांनी सोनसाखळी आणि बनावट दिल्ली पोलीसचे ओळखपत्र जप्त केली आहेत.

आज चारकोप पोलीस कांदिवली सेक्टर-9 येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ गस्त करत होते तेव्हा जाहेद आणि काबुल हे फसवणूक करत असताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतले. या टोळीने गुजरात आणि इतर राज्यांमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी चोरी केल्याचे गुन्हे केले आहेत.