
‘जागतिक वारसास्थळ’ खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचे पुनर्निर्माण करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. हे प्रकरण कोर्टाच्या नव्हे, तर पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकारक्षेत्रात येते असे नमूद करताना, ‘तुम्हीच भगवान विष्णूंकडे जा आणि त्यांच्याकडेच न्याय मागा’, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याचिकाकर्त्याला सुनावले.
जावरी (वामन) मंदिरातील भगवान विष्णूंची 7 फूट उंच मूर्ती खराब झाली असून या मूर्तीचे पुनर्निर्माण करण्याची मागणी याचिकेतून केली होती. याचिकेवर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुघल आक्रमणा वेळी तुटलेली भगवान विष्णूंची मूर्ती शतकानुशतके त्याच स्थितीत आहे. भाविकांच्या पूजा करण्याच्या अधिकाराचे रक्षण आणि मंदिराचे पावित्र्य पुनरुज्जीवित करण्यासाठी ती मूर्ती बदलणे आवश्यक आहे, असे म्हणणे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मांडले. त्यांनी मूर्तीचे छायाचित्र न्यायालयाला दाखवले. मूर्तीचे शिर तुटले असल्याने मूर्तीची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे, असे वकिलांनी सांगितले. त्यावर पुरातत्त्व विभागाने मूर्ती बदलणे हे संवर्धन नियमांच्या विरोधात असल्याचा दावा केला. दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे नमूद केले आणि याचिकाकर्त्याला खडे बोल सुनावत याचिका फेटाळली. हे एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवीन बसवणे हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार मान्य होईल का हा स्वतंत्र विषय आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. जर तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल तर तेथे भगवान शंकराचे एक विशाल शिवलिंग आहे. त्याची पूजा करा, असे खंडपीठाने नमूद केले.
हिंदूंच्या भावना दुखावणारे विधान मागे घेण्याची विनंती
सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पणीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या विधानाबाबत पुनर्विचार करा आणि ते विधान मागे घ्या, अशी विनंती करीत ऍड. विनीत जिंदाल यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. जिंदाल यांनी आपण भगवान विष्णूंचा सच्चा भक्त असल्याचा दावा केला आहे. न्यायालयांना याचिका दाखल करून घ्यायची की फेटाळायची याचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या प्रक्रियेत धार्मिक भावना अनावश्यकपणे दुखावल्या जाणार नाहीत याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे ऍड. जिंदाल यांनी पत्रात म्हटले आहे.
तुम्ही भगवान विष्णूंचे कट्टर भक्त असल्याचे म्हणता ना, मग भगवान विष्णूंकडेच जा आणि प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. तुमच्या देवालाच काहीतरी करायला सांगा. खजुराहो हे एक पुरातन स्थळ आहे. पुरातत्त्व विभागाला परवानग्या द्याव्या लागतील.