गॅस बिल पडले 9 लाख रुपयांना

घरगुती वापराच्या गॅसचे बिल भरणे वृद्ध महिलेला चांगलेच महागात पडले. 1060 रुपये बिलाच्या नावाखाली ठगाने त्याच्या खात्यातून 9 लाख 94 हजार रुपये उकळले. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून मंगळवारी त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये बिल भरले नाही तर गॅस पुरवठा बंद केला जाईल असे सांगण्यात आले. त्या मेसेजखाली एक नंबर होता. त्या नंबरवर त्यांनी फोन केला. तो नंबर पाइपलाइन ऑफिस असा दिसत होता. काही वेळाने ठगाने त्यांना एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करून बिलाची रक्कम भरण्याचा महिला या प्रयत्न करत होत्या. त्याचदरम्यान त्यांना ओटीपी नंबर येत नसल्याने बिल भरले जात नव्हते.

काही वेळाने एका नंबरवरून त्यांना फोन आला. बिल भरण्यासाठी घाई करू नका असे त्यांना सांगण्यात आले. रात्री त्यांनी एका गॅस कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बिल भरले. आज त्यांना मोबाईलवर पैसे गेल्याचा मेसेज दिसला. तिन्ही खात्यांतून ठगाने 9 लाख 94 हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.