
ठाणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांची पालिका प्रशासनाने तब्बल १३ कोटींची बिले थकवली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून तिजोरीत फक्त ४० कोटी शिल्लक राहिले आहेत. या आर्थिक चणचणीमुळे बिले देण्यास विलंब लागत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. बिलांचे पैसे मिळावेत यासाठी प्राधिकरणांचे अधिकारी पालिका मुख्यालयात खेटे मारत आहेत. ही बिले वेळेत न भरल्यास पालिकेला दंडासहित थकबाकी भरावी लागणार आहे. दरम्यान, या ना त्या प्रकल्पावर पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रशासनाच्या तिजोरीवर आणखी ताण वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे शहराला रोज ५८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून १३५, स्टेम कंपनीकडून ११५ आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लिटर असा पाणीपुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराच्या विविध भागात होता. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते आणि त्याचा शहरात पुरवठा केला जातो. दरम्यान स्टेम, एमआयडीसी आणि मुंबई महापालिका या तीन प्राधिकरणांची तब्बल १२ कोटींची बिले टेबलवर पडन आहेत
प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावे लागते
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेमधून पाणीपुरवठा होत असला तरी हे पाणी पुरेसे नसल्याने स्टेम, एमआयडीसी आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला १२ ते १५ कोटी या प्राधिकरणांना मोजावे लागतात. मात्र सध्या महापालिकेला पुन्हा एकदा आर्थिक चणचण जाणवू लागल्याने ही प्राधिकरणाची बिले थकली आहे.
ही बिले थकली
स्टेम प्राधिकरणाला ५.११ कोटी, एमआयडीसी प्राधिकरणाला ४ कोटी तर मुंबई महापालिकेला ३ कोटी असे एकूण १२ कोटींची बिले टेबलवर पडून आहेत. दरम्यान, ही बिले देण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
ठाणे पालिकेच्या तिजोरीत सध्याच्या घडीला फक्त ४० कोटी शिल्लक असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
दुसरीकडे दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी कामगारांची ६ ते ७कोटींची बिले शिल्लक असून त्यांची बिले देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
सध्या आर्थिक घडी बसवण्यात ठाणे महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर येणाऱ्या जीएसटीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार दिला जातो.