बेकायदा बांधकामांवरून ठाणे पालिका आयुक्तांना न्यायालयाचे 19 प्रश्न; अधिकाऱ्यांची झोप उडाली

ठाणे पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांबाबत ठाणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी १९ प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत. न्यायालयाने प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली असून पालिका आयुक्त न्यायालयाच्या रडारवर आले आहेत.

पालिका हद्दीतील मुंब्रा, दिवा आणि शीळ या भागातील बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने ठाण्याच्या यांची न्यायिक चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती भन्साळी यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, कर्मचारी आणि बांधकाम व्यावसायिक यांची साक्ष घेतली आहे. या साक्षीनंतर भन्साळी यांनी बेकायदा बांधकामांप्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भन्साळी यांनी महापालिका आयुक्त राव यांना थेट १९ प्रश्न विचारले आहेत.

महत्त्वाचे प्रश्न कोणते ?
२०१५ पासून २४ हजार ५८८ बेकायदा बांधकाम निष्कासित केल्याचे नमूद केले आहे, तर साक्षीमध्ये ३६५ इमारती पूर्णपणे निष्कासित केल्याचे नमूद केले. यामध्ये विकासकाकडून बांधकाम खर्च वसूल करण्यात आला का?
२०२० पासून १३ सहाय्यक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. या चौकशीचा निकाल काय लागला? निकाल प्रलंबित असल्यास तो कोणासमोर, कधीपासून चालू आहे?
२०२१ मध्ये काही चौकशा निवृत्त न्यायाधीश कुलकर्णी यांच्याकडे सुरू करण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांची २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या चौकशीचे काय झाले?
सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी २०२३ मध्ये शपथपत्र दाखल केले. त्यांची सद्यस्थिती काय आहे? सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी संतोष भोईर यांना दहा इमारतींवर कारवाई पूर्ण केली असे कळवले. मात्र इमारती त्या ठिकाणी आजही उभ्या असल्याबाबत पुरावा आलेला आहे. त्याबाबत सद्यस्थिती काय आहे?
ऑगस्ट २०२१ मध्ये उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त या पदावर कोण अधिकारी होते? प्रणाली घोंगे यांची तडकाफडकी वृक्षप्राधिकरण विभागामध्ये बदली करण्यामागे काय कारण होते?
२०२१ साली तत्कालीन सहाय्यक आयुक्त पाटोळे व बोरसे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना बढतीही देण्यात आली. या चौकशीचा अंतिम निकाल काय लागला?